प्रवाशांशी गैरवर्तणुकीवरून महिला वाहकासह चालक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 04:10 PM2019-12-25T16:10:43+5:302019-12-25T16:12:15+5:30
प्रवाशांशी गैरवर्तणूक केल्याच्या आरोपावरून येथील आगारात कार्यरत असलेल्या महिला वाहकासह चालकास आगारप्रमुखांनी निलंबित केले आहे.
यावल, जि.जळगाव : प्रवाशांशी गैरवर्तणूक केल्याच्या आरोपावरून येथील आगारात कार्यरत असलेल्या महिला वाहकासह चालकास आगारप्रमुखांनी निलंबित केले आहे.
सूत्रांनुसार, यावल आगारातील महिला वाहक अंजली वाणी व चालक एस.पी. पाटील हे २३ डिसेंबर रोजी रात्री ८.२० वाजेची बस भुसावळहून यावलला आणत होते. तेव्हा महिला वाहकाने यावल येथे येत असलेल्या सुमारे १० ते १५ महिलांना बसमध्ये चढू न देता बस सुरू करण्याची सूचना चालकास दिली. बसमध्ये ज्या सात-आठ महिला होत्या, त्यांनी वाहक व चालकास वारंवार सूचित केले की, आमच्यासोबतच्या महिला व आमची मुले खाली राहिलेली आहेत. त्यामुळे बस थांबवा, मात्र त्याकडे महिला वाहकाने व चालकाने दुर्लक्ष केले. तुम्ही खाली उतरा, असे म्हणून महिलांशी गैरवर्तणूक केली. संतप्त महिलांनी मंगळवारी येथील आगारप्रमुख शांताराम भालेराव यांना निवेदन दिले. या वाहक-चालकावर कठोर कारवाईची मागणी केली होती.
यासंबंधीच्या निवेदनावर जयश्री चौधारी, ज्योती महेश वाणी, रुपाली वाणी, सुवर्णा वाणी, दीपाली खरे, ऐश्वर्या महेश वाणी, भायश्री वाणी, उन्नती चौधरी, प्रिया वाणी, सिध्देश वाणी यांच्या सह्या आहेत.
आगारप्रमुखांनी तातडीने वाहक अंजली वाणी व चालक पाटील यांना निलंबित केले. आगारप्रमुख भालेराव यांनी कारवाईचा अहवाल वरिष्ठाकडे सादर केला आहे.