चिखलमय रस्त्यामुळे औरंगाबाद महामार्गावर वाहनधारकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 08:13 PM2019-07-30T20:13:59+5:302019-07-30T20:14:05+5:30
गेल्या वर्षभरापासून सुरु आहे काम : मार्ग बनला धोकादायक, अपघातांच्या प्रमाणात वाढ
वाकोद, ता.जामनेर :औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरण रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरु असून त्यात हा रस्ता दुतर्फा खोदुन ठेवल्याने वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर या मार्गावरील वाहतूकही अत्यंत धोकादायकही झाली आहे. याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खोदून ठेवलेल्या या रस्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या चिखलामुळे वाहन चालविणे मोठे जिकरीचे बनले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोऱ्या बनविण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्ता खोदून ठेवला असून वाहतुकीसाठी कच्चा रस्ता केला आहे. मात्र या कच्च्या रस्त्यावरून दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ सुरू असते. हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा असल्याने व नेहमीच्या वर्दळीमुळे या रस्त्यावर वाहनांची गती थोडी कमी असतानाही लहान मोठ्या अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे.
नेहमी या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु असते. सध्या असलेल्या डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी १५ ते २० फुटांपर्यंत मुरूम व माती टाकून वाढीव रस्त्याचे काम करण्यात आले आहे.
रस्त्यावर मुरुम व माती मोठ्या प्रमाणात असल्याने पाऊस असल्यास चिखल होतो व नसल्यास सतत धुळ उडत असते. यामुळे शेतातील पिके खराब होऊन शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. मात्र याचे कोणतेही सोयरे सुतक सबंधित ठेकेदाराला किंवा लोकप्रतिनिधीना नसल्याचे दिसत आहे.
वाहनांची बैलगाडी पेक्षाही वाईट स्थिती
गेल्या अनेक महिन्यापासून औरंगाबाद महामार्ग हा संबंधित ठेकेदार यांनी खोदून ठेवलेला आहे. मोठ मोठे खड्डे तसेच वर -खाली रस्ते यामुळे चांगल्या वाहनातही बैलगाडी पेक्षाही प्रचंड दणके वाहनधारकांना बसत आहेत. या रस्त्यावर गाडी चालवणे मोठे जिकरीचे बनले असून वाहनांचे मोठे नुकसान होत आह. यामुळे वाहन धारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर प्रवासाचा वेळही खूपच वाढत आहे. तरी एक बाजू का होईना वाहनधारकांसाठी तयार करण्यात यावी व रहदारी सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.
करावा लागतोय अडचणींचा सामना
जळगाव- औरंगाबाद महामार्गावर नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशी- विदेशी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. तसेच औरंगाबाद येथे विमानतळ, हायकोर्ट तसेच पर्यटन स्थळे असल्याने या रस्त्यावर चांगलीच वर्दळ असते.
पिंपळगाव-वडगाव रस्त्याने वाढली वर्दळ
पहुर ते वाकोद दरम्यान रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने जळगाव -औरंगबाद प्रवास करणारे सध्या वाकोद वडगाव-पिंपळगाव मार्गे पहूर असा प्रवास करीत आहेत. शनिवार पासून सलग तीन दिवसापासून पाऊस सुरू असून सोमवार रोजी पहुर- वाकोद रस्त्यावर चिखलामध्ये गाडी अडकल्याने दुतर्फा वाहतुक खोळबंली होती. यामुळे वडगावमार्गे वाहनांची मोठी वर्दळ वाढलेली होती.