जळगावात मुलीस नांदविण्याच्या नकाराने वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:31 PM2018-05-28T14:31:24+5:302018-05-28T14:31:24+5:30
लग्न होऊन महिना सुध्दा पूर्ण झाला नसताना पत्नीला वागविण्यास नकार देत फारकती द्यावी असे सांगितल्यानंतर या गोष्टीचा जबरधक्का बसून मुलीचे वडील रामदास हिंमत चव्हाण (वय-६०, रा़ धामणगाव, ता़ चाळीसगाव) यांना समाजाच्या बैठकीतच हृदयविकाराचा झटका आला़
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२८ : लग्न होऊन महिना सुध्दा पूर्ण झाला नसताना पत्नीला वागविण्यास नकार देत फारकती द्यावी असे सांगितल्यानंतर या गोष्टीचा जबरधक्का बसून मुलीचे वडील रामदास हिंमत चव्हाण (वय-६०, रा़ धामणगाव, ता़ चाळीसगाव) यांना समाजाच्या बैठकीतच हृदयविकाराचा झटका आला़ ही घटना रविवारी सायंकाळी घडली. यानंतर जवळच असलेल्या खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले़ याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत पतीच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच संतप्त नातेवाईकांनी पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या घटनेबाबत कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास चव्हाण यांना चार मुली आणि एक मुलगा असून रूपाली या तिसऱ्या मुलीचा विवाह नांद्रा -कानळदा येथील दीपक वाघ यांच्याशी गेल्या महिन्यात २८ एप्रिल रोजी नांद्रा येथे समाजबांधवांच्या उपस्थित लावून देण्यात आला आहे. या लग्नास जेमतेम महिना होत नाही, तेवढ्यात पती दिपक वाघ यांनी सावळा रंग, पांढरे डाग असे रूपाली हिच्यावर ठपके ठेऊन त्रास देणे सुरू केले होते, असा आरोप आहे़ दरम्यान, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नातवाईकांनी जावून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली असली तरी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
बैठकीतच धक्काबुक्की व शिवीगाळ
नवदाम्पत्यातील समज-गैरसमज दुरकरून दोघांनी सुखाने नांदावे या विचारातून दोन्ही बाजूचे नातेवाईक तसेच समाजबांधवाची बैठक रविवारी दुपारी पाच वाजता शहरातील संत गाडगेबाबा उद्यानात आयोजित केली होती. यासाठी नांद्रा तसेच धामणगाव येथील नातेवाईकांसह रूपालीचे वडील रामदास चव्हाण हे उपस्थित होते. बैठकीत दिपक (पती) हा बोलत असताना त्याने पत्नी रूपाली हिच्याशी संसार करायवयाचा नाही, असे सांगत तुमचे पैसे देऊन टाकतो, पत्नीला फारकत देतो, असे खुलेआम सांगितल्याने याचा धक्का बसून मुलीचे वडील रामदास चव्हाण यांना हृदयविकाराचा झटका आला़ त्यांना उद्यानासमोरच असलेल्या खाजगी रूग्णालयात उपचारार्थ त्वरीत हलविण्यात आले़ दरम्यान, बैठकीत चव्हाण यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला़