चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्या झाली १११५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:16 AM2021-04-18T04:16:15+5:302021-04-18T04:16:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : १४ व १५ एप्रिल रोजी रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली नोंदविण्यात आली होती. मात्र, त्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १४ व १५ एप्रिल रोजी रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली नोंदविण्यात आली होती. मात्र, त्या दिवशी चाचण्या कमी असल्याने ही रुग्णसंख्या कमी होते हे शनिवारी समोर आले असून, शनिवारी एकत्रित दहा हजारांवर चाचण्या झाल्याने पुन्हा बाधितांची संख्या वाढून १११५ वर पोहोचली. शनिवारी ८४८१ अँटिजन चाचण्या झाल्या, तर आरटीपीसीआरचे २७०० अहवाल समोर आले आहेत. दरम्यान, शहरात बाधितांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. २६० नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत.
शहरातील ३ बाधितांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या ४५० वर पोहोचली आहे. सातत्याने शहरातील मृत्यूसंख्या वाढत आहे. दुसरीकडे १६५ रुग्ण बरे झाले आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये १५ बाधित आढळले असून, १ मृत्यू झाला आहे.
चाचण्या अशा
आरटीपीसीआर झालेल्या चाचण्या : २२७६
आरटीपीसीआर आलेले अहवाल : २७००
आरटीपीसीआर पॉझिटिव्हिटी : १८.७० टक्के
अँटिजन पॉझिटिव्हिटी : ७.१९ टक्के
आव्हाण्याच्या वीसवर्षीय तरुणीचा मृत्यू
आव्हाणे, ता. जळगाव येथील २० वर्षीय कोरोनाबाधित तरुणीचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या तरुणीला ४ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी या तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जीएमसीच्या वॉररूममध्ये याबाबत नोंद करण्यात आली आहे.
ते दहा व्हेंटिलेटर कार्यान्वित
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला पीएम केअरकडून प्राप्त झालेले १० व्हेंटिलेटर हे आपत्कालीन कक्षात कार्यान्वित करण्यात आले आहेत. या ठिकाणचे व्हेंटिलेटर आवश्यक त्या कक्षात पोहोचविण्यात आले आहेत.