निपाणे, ता.एरंडोल, जि.जळगाव : सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. यामुळे सुमारे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी ही जीर्ण पाईपलाईनद्वारे होत आहे.
ही पाईप लाईन गिरणा नदीवरुन जवळपास १५ कि.मी.रोडच्या साइडने आलेली आहे व अंतुर्ली गावाजवळ या पाईप लाईनचा फिल्टर प्लॅन आहे. या पाईप लाईनवर जवळपास २५ ते ३० व्हॉल व नॉनरिटर्न व्हॉल आहेत. त्यापैकी मोजून १० ते १२ व्हॉल हे सुस्थितीत आहेत. त्यापैकी बाकीच्या व्हॉल्सना शेताजवळ, तर नाल्याजवळ गळती लागलेली आहे. याच गळती लागलेल्या व्हॉल्सच्या पाण्यावर काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे, तर काहींनी ते पाणी विहिरीत उतरवले आहे. हे सर्व दृश्य सर्वांसमोर दिसते. तरी देखील या योजनेचे कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.दरम्यान, यासंदर्भात काही शेतकरी या योजनेच्या कर्मचाऱ्यांना मिळाले आहेत, अशी चर्चा होत आहे.सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर कोणताही अधिकारी येत नाही किंवा पाईपलाईनची स्थिती काय आहे हेसुद्धा पाहत नाही.गळती होणाºया या पाईप लाईनमधून ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी होते. उर्वरित पाणी अंतुर्ली गावाजवळ फिल्टर प्लॅनवर पोहचते. याकडे अधिकारीच बघ्याची भूमिका घेत असल्याचा त्रस्त नागरिकांचा आरोप आहे.एकीकडे पाण्याची नासाडी होत आहे तर दुसरीकडे पाण्याची टंचाई, अशी स्थिती आहे. सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही जीर्ण झालेली आहे. या योजनेवर पूर्वी १५ ते १६ गावांना दर चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. आता या योजनेवर मोजून चार ते पाच गावे अवलंबून आहेत. तरीदेखील दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तसेच वर्षाची पाणीपट्टी आकारली जाते. ती जवळपास २१०० रुपयांपर्यंत आहे. या योजनेची अधिकाºयांनी स्वत: चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा पाईप लाईन ही काही ठिकाणी जमिनीत आहे अशा ठिकाणी मोकाट कुत्री, गुरेढोरे पाणी पितात व उष्णतेमुळे बसतात. त्याचा पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा केला जातो.अंतुर्ली गावाजवळ पाणी फिल्टर प्लॅन आहे. मात्र तो कित्येक वर्षांपासून बंद आहे. या पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.