पावसामुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्या १० ते १२ तास उशिराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:13+5:302021-07-19T04:12:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दोन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द आणि सुरू असलेल्या गाड्याही विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द आणि सुरू असलेल्या गाड्याही विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले, तर आता शनिवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. परिणामी रविवारी मुंबईकडून येणाऱ्या महानगरी, हावडा, अमृतसर, काशी यासह अनेक सुपरफास्ट गाड्या हा १० ते १२ तास विलंबाने धावल्या. यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी १६ व १७ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या तब्बल ३४ तासांच्या ब्लॉकमुळे २० एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याने, हजारो प्रवाशांना तिकिटे रद्द करावी लागली. विशेष म्हणजे प्रवाशांना बाहेरगावी जाण्याचे नियोजित दौरे रद्द करावे लागले. या सर्व प्रकारामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला. दरम्यान, मेगाब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या गाड्या रविवारपासून पुन्हा सुरू होत असताना, मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गाड्या पुन्हा रखडल्या आहेत. दादर ते ठाणे स्टेशनदरम्यान अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी तुंबल्याने, रेल्वे प्रशासनाने शनिवारी रात्री मुंबईहून जळगावकडे येणाऱ्या गाड्या स्थगित करून, पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर सकाळी सोडल्या. यामध्ये रात्री महानगरी एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने पावसामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, त्या गाड्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नाहीत.
इन्फो :
माहिती मिळत नसल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गाड्या मुंबईहून १० ते १२ तास विलंबाने सुटत आहेत. मात्र, शनिवारी रात्री सुटणाऱ्या व रविवारी सकाळच्या सत्रातील सुटणाऱ्या गाड्या रविवारी दुपारी दोनपर्यंतही मुंबईहून सुटलेल्या नव्हत्या. त्यामुळे या गाड्या नेमक्या केव्हा सुटणार आहेत की रद्द केल्या जाणार आहेत, याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची सविस्तर माहिती देण्यात येत नसल्यामुळे, प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडाला. रेल्वे प्रशासनाच्या या कारभाराबद्दल अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.