जळगावात पावणे दोन लाखाची लाच घेताना सहायक निबंधकाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:33 PM2018-10-10T12:33:07+5:302018-10-10T12:34:03+5:30
अहवाल अनुकुल देण्यासाठी घेतली लाच
जळगाव : गृहनिर्माण संस्था रद्द होऊ नये म्हणून अनुकुल अहवाल देण्यासाठी जळगावातील एका तक्रारदाराकडून पावणे दोन लाख रुपयांची लाच स्विकारताना सहकार विभागाचा सहायक निबंधक मधूसुदन हरनिवास लाठी (रा.अमळनेर) या वर्ग १ च्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जळगावात रंगेहाथ पकडले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तक्रारदाराची गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेतील कार्यकारिणीत वाद आहेत. त्याचा निकालही तक्रारदाराच्या बाजूने लागलेला आहे. मात्र त्यावर काही जणांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर सहकार विभागाचे सहायक निबंधक मधुसूदन लाठी यांचा अनुकुल अहवाल हवा होता. या अहवालासाठी लाठी यांनी तक्रारदाराकडे पावणे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार केली होती.
हॉटेलमध्ये लावला सापळा
तक्रारदाराच्या तक्रारीची वेळावेळी पडताळणी झाल्यानंतर उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, हेडकॉन्स्टेबल श्याम पाटील, अरुण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर व महेश सोमवंशी यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता काव्यरत्नावली चौकातील एका हॉटेलमध्ये सापळा लावला. लाठी यांनी दीड लाखाची रक्कम स्विकारताच पथकाने त्याच्यावर झडप घातली. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला मधुसूदन लाठी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक निलेश लोधी करीत आहेत.
लाठी वर्ग १ चा अधिकारी
मधुसूदन लाठी हा वर्ग १ दर्जाचा अधिकारी आहे. एरंडोल येथे सहायक निबंधक म्हणून त्याची मुळ नियुक्ती असून जळगावचा त्याच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. मू.जे.महाविद्यालय परिसरात एका कॅफेच्या वरच्या मजल्यावर सहकार विभागाच्या सहायक निबंधकाचे कार्यालय आहे. दरम्यान, लाठी याला अटक केल्यानंतर उपअधीक्षक ठाकूर यांचे पथक त्याला घेऊन अमळनेर येथील घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत घरझडती सुरु होती.
दरम्यान, या कारवाईमुळे सहकार विभागात खळबळ उडाली आहे.