भूषण श्रीखंडे
जळगाव : दिवाळी सणाच्या सुट्या संपत असून, सोमवारपासून कामांवर हजर होण्यासाठी शनिवार व रविवार हे दोन दिवस रेल्वे गाड्यांना प्रवाशांची तुफान गर्दी दिसत आहे. मुंबई, पुणे तसेच सुरतकडे जाणाऱ्या सर्वच गाड्या प्रवाशांच्या गर्दीने भरलेल्या आहे. जळगाव रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्मवर गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गर्दी दिसत आहे.
दिवाळी सणानिमित्त घरी आलेल्या नागरिकांना आता नोकरीच्या गावाला जाण्यासाठी परतीच्या प्रवासाचे वेध लागलेले आहे. अनेकांनी दिवाळी सणाला घरी येण्यासाठी व परत जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण आधीच करून ठेवले होते. मात्र ज्या प्रवाशांना आरक्षण तिकीट मिळाले नाही त्यांना जनरल तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. परंतु रेल्वे गाडीतील जनरल बोगीमध्ये पाय ठेवायलादेखील जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकात गाडी आल्यावर जनरल बोगीत प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडालेली दिसत आहे. यात महिला, लहान मुलांचे तर प्रचंड हाल होत आहे.
प्लॅटफार्मवर गर्दी
रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म एक व दोनवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. जळगाव जिल्ह्यासह तालुक्यातून अनेक प्रवासी एक ते दोन तास आधी रेल्वे स्टेशनवर येऊन प्लॅटफार्मवर गाडीची वाट पाहत आहे. त्यामुळे प्लॅटफार्म प्रवाशांच्या गर्दीने भरलेला दिसत आहे.
गाडी आल्यावर होते पळापळदिवाळी सणामुळे सर्व रेल्वे गाड्यांना गर्दी असल्याने रेल्वेच्या सर्व बोगी या प्रवाशांनी भरलेल्या आहेत. त्यात जळगाव रेल्वे स्टेशनवरून गाडीची वाट पाहत असलेले प्रवासी गाडी येताच जनरल डब्यात जागा मिळावी यासाठी एकच गर्दी करताना दिसत आहेत. त्यात जनरल बोगीमध्ये प्रवेश मिळत नसल्याचे पाहून दुसऱ्या बोगीमध्ये जागा शोधण्यासाठी पळापळ करावी लागत आहे.
रेल्वे पोलिस सतर्क
रेल्वे स्टेशनवर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे स्टेशन परिसर व प्लॅटफार्मवर रेल्वे पोलिसांनी गस्त वाढवली आहे. कोणताही अनुचित प्रकार, चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलीस कार्य करीत आहे.