लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : जिल्हाभरात बाराशेहून अधिक सभासद असणाऱ्या जळगाव जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी १०.३० वाजता अध्यक्ष कैलास तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली. सभेत जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
सद्य:स्थितीत कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहता सर्व सभासदांचा विमा उतरवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याचबरोबर कवयित्री बहिणाबाई चौधरी कन्यादान योजनेत मुलीच्या विवाहासाठी यापूर्वी देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली. हा निधी पाच हजाराहून सहा हजार करण्यात आला आहे. सभासदांनी मांडलेल्या सुचनांचा विचार करण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करण्याचेही आश्वासित केले गेले. संचालक मंडळाने कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयांचे सभासद शिक्षकांनी स्वागत केले. ऑनलाईन सभेतही महिला सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सभेच्या इतिवृत्ताचे वाचन प्रकाश साखरे यांनी केले. त्याला सभासदांनी मान्यता दिली.
यावेळी पतपेढीचे उपाध्यक्ष व व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक अजय सोमवंशी यांच्यासह संचालक रवींद्र भावसिंग पाटील, देवेंद्र चौधरी, रवींद्र पाटील, महेंद्रसिंग पाटील, सचिव प्रकाश साखरे आदी उपस्थित होते.
फक्त कन्या असणाऱ्या सभासदांना ११ हजार रुपये विवाह भेट
पतपेढीने सुरु केलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी कन्यादान योजनेतर्गत कन्या असणाऱ्या सभासदांना मुलीच्या विवाहासाठी सहा हजार रुपये भेट दिले जाणार आहेत. यासभेपूर्वी हा निधी पाच हजार एवढा होता. ज्या सभासदांना फक्त मुलगी हेच अपत्य आहे. त्यांना मुलीच्या विवाह सोहळ्यात ११ हजार रुपये विवाह निधी भेट स्वरुपात देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सभेत घेण्यात आला. या निर्णयाचे सभासदांनी स्वागत केले असून संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.