सध्या कोरोनाकाळात शासनाच्या सूचनेनुसार योग्य त्या अटी-शर्तींचे पालन करून विमानसेवा सुरू आहे. यात आठवड्यातून बुधवारी, शनिवारी व रविवारी अहमदाबाद ते जळगावची सेवा सुरू असून, दर रविवारी मुंबईसाीठ सेवा सुरू आहे. आठवड्यातून तीनच दिवस ही सेवा असली तरी, प्रवाशांचा या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मुंबईची सेवा एकच दिवस असल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शासनाच्या सूचनेनुसार सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादहून येणाऱ्या ५२२ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी विमानतळावर नाइट लॅडिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे, रात्रीदेखील विमाने उतरत आहेत. त्यामुळे जळगाव विमानतळावरून अहमदाबाद-मुंबई विमानसेवेसह पुणे व इंदूरसाठी सेवा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात खासदार उन्मेश पाटील यांनी अलायन्स विमान कंपनीच्या दिल्ली येथील अधिकाऱ्यांशी या सेवेबाबब चर्चा केली होती. या कंपनीने पुणे व इंदूर सेवेसाठी सकारात्मकता दर्शविली आहे.