लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदाच्या पावसाळ्याचा दीड महिना उलटला तरी सलग जोरदार पाऊस नसल्याने जिल्ह्यातील विविध धरणांच्या साठ्यात केवळ १.०२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतर धरणसाठ्यांत किरकोळ वाढ होत असली तरी वाघूर धरणसाठ्यात तर पावसाळा सुरू झाल्यानंतर १.९४ टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या गिरणा धरणात केवळ ०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यांबाबत चिंता वाढत असल्याची स्थिती आहे.
हवामान खात्याने यंदा जून महिन्यात पावसाची सरासरी कमीच वर्तविली होती. त्यानुसार जून महिन्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही, तसेच जुलै महिनादेखील निम्म्याहून अधिक उलटला असला तरी जिल्ह्यात सलग असा जोरदार पाऊस झालेला नाही. मध्येच पाऊस होतो व नंतर उघडीप देत आहे. त्यामुळे बळीराजासह धरण साठ्यांमध्येही वाढ होण्यासाठी सलग जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा सलग पाऊस नसल्याने मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये किरकोळ चढ-उतार होत असल्याने जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांच्या साठ्यात केवळ १.०२ टक्केे वाढ होऊ शकली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पांमध्ये ३२.७३ टक्के जलसाठा होता, तो १८ जुलैपर्यंत केवळ ३३.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४२.४२ टक्के होता.
गिरणा धरणात वाढीची अपेक्षा
नाशिक जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जळगाव तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणसाठ्यात यंदा अजूनही फारसी वाढ झालेली नाही. १ जून रोजी ३७.०२ टक्के जलसाठा असलेल्या या धरणात १८ रोजी ३७.०५ टक्के जलसाठा आहे. म्हणजे दीड महिन्यात केवळ ०.३ टक्क्यांनी या धरणसाठ्यात वाढ झाली आहे.
‘मंगरूळ’ शंभरीकडे, ‘अग्नावती’मध्ये ठणठणाट
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी अग्नावती प्रकल्पामध्ये अजूनही शून्य टक्के साठा आहे. पावसाळ्याच्या अगोदरपासूनच या प्रकल्पासह हिवरा, बोरी प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा होता. त्यानंतर हिवरा धरणात १.०५ टक्के साठा, तर बोरी धरणात ४८.१२ टक्के जलसाठा झाला आहे. मन्याड धरणातही केवळ २१.०८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय अभोरा मध्यम प्रकल्पात ७८.४२ टक्के, मंगरूळ ९७.०३ टक्के, सुकी ८२.६५ टक्के, मोर ५६.८० टक्के, तोंडापूर ४२.८० टक्के, बहुळा १८.७१ टक्के, अंजनी २४.६१ टक्के, भोकरबारी १४.५९ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. १३ मध्यम प्रकल्पांचा एकूण जलसाठा ४१.९० टक्के असून, गेल्या वर्षी हा साठा याच दिवशी ६२.११ टक्के होता. याशिवाय ९६ लघु प्रकल्पांमध्ये सध्या ७.८३ टक्के साठा असून, गेल्या वर्षी २४.९० टक्के होता.