मतीन शेखमुक्ताईनगर,दि.६ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पूर्वीचे एदलाबाद पेठ ते नगरपंचायत असा तब्बल साडेनऊ दशकांचा ग्रामपंचायतीचा इतिहास आहे. या ग्रा.पं.चे पहिले सरपंच म्हणून विष्णू देशमुख यांच्या नावाची नोंद जुन्या कागदपत्रांमध्ये सापडली आहे.पहिले ग्रामसेवकपद भिकाजी कासार यांनी सांभाळले आहे.साडेनऊ दशकांपासून अस्तित्वात आलेल्या या ग्रामपंचायतीच्या जुन्या दप्तरातील कागदपत्र पडताळणीत एदलाबाद ग्रामपंचायत १९२२ ला अस्तित्वात आल्याचे नमूद असलेली १९२५ पासूनची कागदपत्र आढळून आलीत. यात सर्वात जुन्या प्रोसेडिंग पुस्तकातील काही पाने आढळतात. ज्यामध्ये १९२५ मध्ये विष्णू दाजी देशमुख हे सरपंच असल्याचा पुरावा सापडतो.त्यांच्या अगोदर कोणतीही कागदपत्रे नसल्याने १९२२ ला स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतचे पहिले सरपंचपद विष्णू देशमुख यांच्या नावावर आहे. तर ग्रामपंचायतचे पहिले ग्रामसेवक (सेक्रेटरी) म्हणून भिकाजी जयराम कासार होते.या काळात गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात होती. सदस्य संख्या ७ इतकी होती आणि पंचायत कार्यालय जुने गाव चावडीलगत होते. १९७२ मध्ये हतनूर प्रकल्पांतर्गत गावाचे पुनर्वसन झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीस नवीन गाव परिसरात स्थलांतरित करण्यात आले. नवीन इमारत नसल्याने तेव्हा याच भागात जि.प. शाळेच्या खोलीतून कारभार चालविला जात होता. १८८४ मध्ये नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले व दीड वर्षात ग्रा.पं.ला स्वत:ची नवीन इमारत मिळाली. आता नगरपंचायत झाल्याने ग्रामपंचायत हा इतिहास ठरणार आहे. आॅगस्ट १९८८ ते १९९३ दरम्यान प्रशासक नियुक्ती वगळता स्थापनेपासून आजअखेर ३९ सरपंच व ३९ ग्रामसेवकांच्या यादीत शेवटचे सरपंच म्हणून ललित महाजन, तर ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे अंतिम कार्यवाहक म्हणून नोंद राहील.१९६२ मध्ये झाली तालुका निर्मितीएकेकाळचा एदलाबाद पेठ १९६२ च्या काळात एदलाबाद तालुका झाला. त्यानंतर १९९७ मध्ये मुक्ताईनगर असे नामकरण झाले. इकडे सात सदस्य संख्येची ग्रामपंचायत १७ सदस्य संख्येवर पोहोचली. लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढली. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या २३ हजार ९०० इतकी आहे. तर आज रोजी ३० हजार झाली आहे. नगरपंचायत होण्याचे निकष येथे कधीचेच पूर्ण झाले होते. ग्रामविकास खात्याचा निधी व कर रचनेच्या कारणास्तव येथे नगरपंचायतीचा निर्णय माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लांबणीवर टाकला होता.
जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद पेठ ते नगरपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:06 PM
मुक्ताईनगर ग्रा.पं.ला साडेनऊ दशकांचा इतिहास. पहिले सरपंच विष्णू देशमुख
ठळक मुद्देग्रामपंचायतचे पहिले सरपंचपद विष्णू देशमुखपहिल्या ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या होती सात१९८८ ते १९९३ दरम्यान होती प्रशासकाची नियुक्ती