‘अभ्यास जत्रे’तून शैक्षणिक गुणवत्तेसह वाढतेय संवाद कला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 10:38 AM2018-07-16T10:38:26+5:302018-07-16T10:39:47+5:30
जळगावातील स्तूत्य उपक्रम : सात वर्षांपासून के.सी. ई सोसायटीमध्ये यशस्वी प्रयोग
-विजयकुमार सैतवाल
जळगाव : इंग्रजी माध्यम असो की मराठी माध्यम, आज कोणत्याही शाळेत शैक्षणिक गुणवत्तेवर भर दिला जातो. मात्र जळगावातील खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या (के.सी.ई.) पूर्व प्राथमिक वर्गापासूनच शैक्षणिक गुणवत्तेसह संवाद कला वाढण्यावरही भर दिला जात आहे. यासाठी गेल्या सात वर्षांपासून या शाळांमध्ये ‘अभ्यास जत्रा’ हा अनोखा उपक्रम राबवला जात असून त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य व आत्मविश्वास वाढीस लागत आहे.
आज स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यास चांगल्यात चांगले शिक्षण मिळावे म्हणून पालक धडपड करीत असतात. त्यादृष्टीने अनेक नवनवीन शाळाही उदयास येत आहे. त्या ठिकाणी चांगले शिक्षण मिळतही आहे. मात्र जळगावातील खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या (के.सी.ई.) शाळांमध्ये मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह संवाद कौशल्यावरही भर दिला जात आहे. यासाठी संस्थेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी पुढाकार घेत संस्थेच्या किलबिल बालक मंदिर या पूर्व प्राथमिक व गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील या प्राथमिक शाळांध्ये ‘अभ्यास जत्रा’ हा शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे.
अभ्यास जत्रा म्हणजे विद्यार्थ्यांनी आपण शिकत असलेला व परीक्षेत असणारा विषय शैक्षणिक साहित्याद्वारे इतरांना समजावून देण्याचा केलेला प्रयत्न होय. या अभ्यास जत्रेत सर्व विषयांवरील शैक्षणिक साधने शिक्षकांनी अथवा विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने तयार केलेली असतात. या साधनांच्या आधारे विद्यार्थी त्या त्या विषयांची माहिती तोंडपाठ सांगतात. वर्गातही शैक्षणिक साहित्याद्वारे शिकविले गेल्याने विद्यार्थी त्या त्या विषयात पारंगत होतात. यामुळे परीक्षेत त्यांना उत्तरे लिहिणेदेखील सोपे जाते.
गेल्या सात वर्षाचा अनुभव पाहता विद्यार्थ्यांची मौखिक उजळणी होण्यासह मुले चांगल्या प्रकारे संवाद साधू लागले आहेत. निर्भिडपणा आल्याने त्यांच्यात संभाषण कौशल्यही वाढीस लागत आहे. सोबतच भाषेचाही विकास होऊन प्रश्नोत्तराचा उत्तम सराव होत असल्याचा सुखद अनुभव येत आहे, असे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी सांगितले.