कोरोनाला हद्दपार करण्यासीाठी जिल्ह्यातील प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील- गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:20 PM2020-08-15T13:20:12+5:302020-08-15T13:20:20+5:30

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Efforts are being made to make every village in the district self-reliant to evict Corona - Gulabrao Patil | कोरोनाला हद्दपार करण्यासीाठी जिल्ह्यातील प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील- गुलाबराव पाटील

कोरोनाला हद्दपार करण्यासीाठी जिल्ह्यातील प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील- गुलाबराव पाटील

Next

जळगाव - कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्याकरीता जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यापासून ते आवश्यकता भासल्यास बाधित रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध करुन देण्यापर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी राज्य शासनाच्या विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नागरिकांनीही जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हावासियांना केले.

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उप वनसंरक्षक वि. वि. होशिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी, उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, राजेंद्र वाघ, प्रसाद मते, किरण सावंत पाटील,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, नायब तहसीलदार रवी मोरे यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय ‍विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
            
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या पाठिशी शासन भक्कमपणे उभे आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असले तरी मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनामुक्त होत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांपैकी प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करुन कोरोना विषाणूमुळे संकटात सापडलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आणि कोरोना विषाणूच्या रुग्णांवर औषधोपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, खासगी रुग्णालयांसह इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांसह हजारो कोरोना योध्दे अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांचे कौतूक करुन पालकमंत्री म्हणाले, आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका व नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढत आहे. कोरोना विरुध्दच्या या लढ्यात आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध शासकीय, निमशासकीय विभाग, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि सर्व माध्यमातील पत्रकार मित्रांचेही सहकार्य लाभले आहे
            
लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे जिल्हा प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न केले. या श्रमिकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाबरोबरच विविध स्वयंसेवी संस्थांनी केले. कोटा येथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, केरळ, दिल्ली येथून आलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्याचे काम जळगाव एसटी विभागाने केले. जळगाव जिल्ह्यात अडकलेले नागरिक, रुग्णांना आपापल्या गावी किंवा रुग्णालयात औषधोपचारासाठी जाणाऱ्यांना ई-पासचे वितरण आपल्या प्रशासनाने केले.  
            
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 60 आयसीयु बेड तसेच 350 ऑक्सिजनयुक्त बेड तयार केले. जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर येथे 800 पेक्षा अधिक ऑक्सिजनयुक्त बेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांच्या मदतीने तयार झाले आहे. जळगाव जिल्ह्याच्या या पॅटर्नचे देशपातळीवरही कौतूक झाले आहे.

जिल्ह्यात सध्या 12 हजार 546 बेड तयार असून 1578 बेड हे ऑक्सिजनयुक्त तर 210 बेड आयसीयु आहेत. जिल्हा वार्षिक व इतर योजनांमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्ह्यातील उप जिल्हा व ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण, अत्याधुनिक सोईसुविधा तसेच सुरक्षेच्या साधनांसाठी आतापर्यंत 26 कोटी 78 लाख 6 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर 8 कोटी 51 लाख 22 हजार रुपयांचा निधी संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे.
            
लॉकडाऊनच्या काळात अनेक गरीब आणि गरजूंना नागरीकांना शिवभोजनाचा आधार मिळाला. आपल्या जळगाव जिल्ह्यात 38 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यात 4 लाख 92 हजार 348 एवढ्या नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यशासन वेळोवेळी धावून जात आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेतंर्गत खरीप हंगाम 2019 मध्ये जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांना 208 कोटी 34 लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत 2018 मध्ये अंबिया बहार केळी फळपिकासाठी 26 हजार 963 शेतकऱ्यांना 262 कोटी 56 लाख रुपयांचा लाभ मिळाला.

जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या 6 लाख 11 हजार 544 बाधित शेतकऱ्यांना 479 कोटी 31 लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1 लाख 52 हजार 763 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 871 कोटी 1 लाख रुपये जमा करण्यात आले आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 1 लाख 56 हजार 819 शेतकऱ्यांना 503 कोटी 45 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील 53 हजार 244 शेतकऱ्यांकडील 17 लाख 69 हजार 710 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारी बी-बीयाणे व खते कृषि विभागाने शेतकरी गटांमार्फत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविले. शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेत व पाणंद रस्ते सुस्थितीत राहावेत, याकरिता जिल्ह्यातील 500 रस्त्यांच्या कामांना मान्यता देऊन जिल्हा नियोजन व विकास समितीमधून 5 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला.
            
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कोणीही नागरीक अन्नापासून वंचित राहू नये याकरीता जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील 1 लाख 35 हजार 212 कुटूंबाना व प्राधान्य कुटूंब योजनेतील 22 लाख 17 हजार 840 लाभार्थ्यांना गहू व तांदूळ, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्ना योजनेतंर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील एकूण 27 लाख 66 हजार 221 लाभार्थ्यांना 44 हजार 325 मेट्रीक टन मोफत तांदूळ,  अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतंर्गत पात्र नसलेल्या व एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना 9 हजार 165 मेट्रीक टन अन्नधान्य जिल्ह्यातील 13 लाख 47 हजार 830 लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील विनाशिधापत्रिकाधारक 1 लाख 85 हजार 836 लाभार्थ्यांना 763 मेट्रीक टन तांदूळ आत्मनिर्भर योजनेतंर्गत उपलब्ध करुन देण्यात आला.
            
वैयक्तीक लाभाच्या योजना गरजुंपर्यंत पोहचविण्यासाठी प्राधान्य देत असतांनाच जिल्ह्यात सिंचन, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधांवर भर देण्यात येणार असून आपल्या जळगाव जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            
यंदाचा स्वातंत्र्य दिन समारंभ साध्या पध्दतीने साजरा करण्याचे शासनाने निश्चित केल्याने जिल्ह्यातील  विष्णू भादू खडके, जगन्नाथ अखर्डू चौधरी,  मुरलीधर इच्छाराम चौधरी, वासुदेव नामदेव महाजन,  महादू तंगू वाणी या निवडक स्वातंत्र्य सैनिकांना तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पातोंडे, डॉ. संजय पाटील, डॉ. अश्विनी विसावे, डॉ. राहूल निंबाळकर, श्रीमती मारिया आरोळे,  धनराज सपकाळे, अक्षय गोयर, अभिमान प्रल्हाद सुरवाडे, विवेक रमेश सैदाणे,  सुरेश सोनवणे या कोरोना योध्दाबरोबरच  साखराबाई धनजी मराठे (विरमाता), निर्मला सुवालाल हनुवते (विरपत्नी), इंदुबाई पुंडलिक पाटील (विरमाता), कल्पना विलास पवार (विरपत्नी),  सरला बेडीस्कर (विरपत्नी),  लक्ष्मीबाई भिवसन पाटील (विरमाता),  अनुसयाबाई काशिनाथ शिंदे (विरमाता),  तुळसाबाई रोहिदास बागुल (विरमाता), सुनंदा वसंत उबाळे (विरपत्नी), सुरेखा पोपट पाटील (विरपत्नी), कविता राजू साळवे (विरपत्नी), चंद्रकला आनंदा जाधव (विरमाता), कल्पना देवीदास पाटील (विरपत्नी),  सुनंदा मनोहर पाटील (विरमाता), रंजना अविनाश पाटील (विरपत्नी), शैला अनंतराव साळूंखे (विरमाता),  रमेश देवराम पवार (विरपिता) या विरमाता, पिता व पत्नी हे कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांसह उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.
            
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जळगाव पोलीस दलाच्या पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तर बॅण्ड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. जी. एम. उस्मानी आणि राजेश यावलकर यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण
 
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3 च्या आवारातही सकाळी आठ वा. ध्वजारोहण करण्यात आले. जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक वि. वि. होंशिग, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजसिंग परदेशी, सहायक मुद्रांक अधिकारी सुनील पाटील, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, आंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Efforts are being made to make every village in the district self-reliant to evict Corona - Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.