जळगाव : रविवार व सोमवार हे दोन दिवस जळगाव जिल्ह्यासाठी घातवार ठरले. दोन बालकांसह सहा जणांचा बुडून, तर दोन तरुण अपघातात ठार झाले. श्री विसर्जनाच्या दिवशी व नंतर या घटना घडल्या आहेत.
चुलत बहीण - भावाचा तलावात बुडून
तलावाजवळ खेळत असताना पाण्यात बुडून चुलत बहीण- भावाचा करुण अंत झाला. ही घटना जांभूळ, ता. जामनेर शिवारात रविवारी दुपारी १.३० वाजता घडली. पायल नितीन जोशी (७) व रुद्र गोरख जोशी( ५) अशी मृत बहीण- भावाची नावे आहेत. गणपती विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडल्याने जांभूळ गावावर शोककळा पसरली आहे.
दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
वाघळी, ता. चाळीसगाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली.
साहिल शरीफ शहा (१०) व आयान शरीफ शहा (१४, दोघेही रा. वाघळी) अशी या मृत मुलांची नावे आहेत.
डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार
भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाच्या भैरवनाथ मंदिराजवळ घडली. मोहम्मद शाकीर अली जाकीर अली ( २८) आणि शमीम शाह (२६, रा. मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे बांधकाम मजूर होते.
बाळापूरला नदीत बुडून
बोदवडच्या तरुणांचा मृत्यू
बाळापूर, जि. अकोला येथे रस्त्याच्या साइटवर कामास गेलेल्या महेश घनश्याम शर्मा (२८, रा. बोदवड) या तरुणाचा बाळापूर येथील नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. खिशातील कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली.
पाय घसरून विहिरीत
पडल्याने युवकाचा मृत्यू
शेतात फवारणी केल्यानंतर पाणी काढण्यासाठी गेलेल्या राकेश अधिकार पाटील (३१, रा. रढावण, ता. अमळनेर) या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.