जळगाव : जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन हे वेळेवर मिळत नसल्याने त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थिती प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन हे वेतन वेळेवर द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत संघटनेकडून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
शासन आदेशानुसार हे निवृत्ती वेतन १ ते ५ तारखेच्या आत अदा करण्यात आले पाहिजे. मात्र, गेल्या वर्षभरापासून हे निवृत्तीवेतन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, ९० टक्के सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नी या विविध आजारांनी त्रस्त आहेत. अशा स्थितीत त्यांना वेळेवर औषधोपचारासाठी मोठा खर्च लागत असून ही निकड या निवृत्तीवेतनातूनच पूर्ण होत असते. अशा स्थितीत हे वेतन वेळेवर न मिळाल्यास त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थिती ज्येष्ठांचे हाल होत आहे.
वारंवार विलंब का
जून महिन्याचे निवृत्तीवेतन जुलै उलटत आला तरी अद्याप मिळालेले नसून याला वारंवार विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. लेखा कोषागार विभागाच्या संचालकांनी नियमित वेतन देयके दर महिन्याच्या २० तारखेच्या आत कोषागार कार्यालयात सादर करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अर्थ विभाग याकडे लक्ष देत नसून ज्येष्ठ नागरिकांचा छळ चालविला असल्याचा आरोप वेतनधारकांनी केला आहे. याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी तुळशीराम सूर्यवंशी व सैय्यद जमील सैय्यद हबीब यांनी केली आहे.