रावेर तालुक्यातील रोझोदा येथे वयोवृध्द पती-पत्नीची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 04:04 PM2020-09-10T16:04:37+5:302020-09-10T16:05:50+5:30
वयोवृध्द पती-पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना ९ सप्टेंबर मध्यरात्री घडली.
सावखेडा/फैजपूर, जि.जळगाव : रोझोदा, ता.रावेर येथे वयोवृध्द पती-पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना ९ सप्टेंबर मध्यरात्री घडली. ओंकार पांडुरंग भारंबे (वय ९०) आणि सुमनबाई ओंकार भारंबे (वय ८४) अशी मयतांची नावे आहेत. यातील ओंकार भारंबे हे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी होते. घटनेचे निश्चित कारण समजले नसले तरी चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सूत्रांनुसार, रोझोदा येथे ओंकार पांडुरंग भारंबे यांच्या घराच्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्र असल्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यसेवक हारुन काझी हे या परिसरात गुरुवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आरोग्य तपासणीसाठी गेले.
घराचा दरवाजा उघडा असल्याने घरात प्रवेश केल्यानंतर ओंकार पांडुरंग भारंबे (वय ९०) आणि सुमनबाई ओंकार भारंबे हे दोघे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलीस पाटील वासुदेव हिवरे यांनी सावदा पोलिसांना दिली.
ओंकार भारंबे यांच्या मानेवर तसेच सुमनबार्इंच्या पोटावर व मानेवरही तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दिसते.
घटनास्थळी फॉरेंसिक लॅब घडलेल्या घटनेचा विचार करता चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळी श्वान मागविण्यात आले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, डीवाय.एस.पी.गजानन राठोड, सावदा पोलीस उपनिरीक्षकद्वय राहुल वाघ व राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.
मयतांच्या पश्चात सुनील व संजय ही दोन मुले असून, ते दोन्ही मुंबईला नोकरीस आहेत.
भरवस्तीत घटना घडल्याने रोझोदा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.