जिल्हा बँकेच्या निवडणूक आखाड्यात मातब्बरांमध्ये उमेदवारीसाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:26+5:302021-08-28T04:20:26+5:30

चाळीसगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वीच्या हालचाली गतिमान झाल्या असून सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधण्यासाठी पालकमंत्री मैदानात उतरले आहे. ...

In the election arena of the district bank, there is a rush for candidature among the rich | जिल्हा बँकेच्या निवडणूक आखाड्यात मातब्बरांमध्ये उमेदवारीसाठी चुरस

जिल्हा बँकेच्या निवडणूक आखाड्यात मातब्बरांमध्ये उमेदवारीसाठी चुरस

Next

चाळीसगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वीच्या हालचाली गतिमान झाल्या असून सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधण्यासाठी पालकमंत्री मैदानात उतरले आहे. त्यामुळे उमेदवारीविषयी औत्सुक दरदिवशी वाढत आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना असे वेगवेगळे झेंडे बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र होऊ शकतात.

चाळीसगावच्या कुरुक्षेत्रावर याचे पडघम वाजू लागले आहे. विद्यमान आमदारांसह, माजी आमदार आणि जळगाव लोकसभेचे खासदार यांची नावे सर्वपक्षीय पॅनलसाठी चर्चेत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व कुणाचेही असले तरी, चाळीसगावातून नेहमीच उमेदवारीबाबत चर्चा होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटी गटात चाळीसगाव तालुक्याने आपली मांड पक्की केली आहे. गत निवडणुकीतही माजी आमदार राजीव देशमुख यांनी याच गटातून तत्कालिन आमदार व विद्यमान खासदार गटाला धूळ चारत विजयी गुलाल उधळला होता. विशेष म्हणजे याच गटातील भाजपच्या अधिकृत उमेदवारालाही पराभवाचे अस्मान पहावे लागले होते.

एकीकडे पालिकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असतानाच पुढील वर्षी मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. अशा मध्यावर मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कधीही घोषित होऊ शकतो. यामुळेच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये तगड्या उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. ३० रोजी जिल्हास्तरावर सर्वपक्षीय पॅनलसाठी बैठक होत आहे. मात्र उमेदवारांच्या नावांची चर्चा आता पासूनच रंगू लागली आहे.

.......

चौकट

- गेल्यावेळी नाट्यमय घडामोडी गत निवडणुकीत चाळीसगावला नाट्यमय घडामोडींमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. सोसायटी गटात क किंवा ड वर्गात असणाऱ्या थकबाकीदार संस्थेच्या प्रतिनिधीला निवडणूक लढविता येत नाही. याच मुद्यावर तत्कालिन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी रद्द झाला होता. त्यामुळे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनोज साबळे, कैलास सूर्यवंशी व राजीव देशमुख या तिरंगी लढतीत २५ मते मिळवत राजीव देशमुख विजयी झाले होते.

.............

चौकट

आमदारांचे नाव चर्चेत

माजी मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक आमदार मंगेश चव्हाण यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले आहे. विद्यमान संचालक व माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नावाचीही चर्चा आहे. सर्वपक्षीय पॅनलचा 'जुगाड' झाल्यास दोन्हींपैकी एका नावावर उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब होऊ शकते. आमदार व माजी आमदार यांच्या उमेदवारीसाठी सोसायटी गटातून विचार होऊ शकतो.

1..इतर मतदार संघाच्या सहा जागांसाठी संभाव्य चर्चेतील नावांमध्ये जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांचेही नाव पुढे आले आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचेही नाव खासदार पाटील यांना पर्याय म्हणून चर्चेत आले आहे.

2...गेल्यावेळी एनटी संवर्ग गटात चाळीसगावचे वाडिलाल राठोड यांनी माजी जि.प. सदस्य मंगेश राजपूत यांचा पराभव केला होता. राठोड यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र माजी जि.प. सदस्य राजेश राठोड यांना संचालकपदाची संधी मिळाली. संभाव्य इच्छुकांच्या चर्चेतील नावांमध्ये राजेश राठोड यांच्या ऐवजी मेहताबसिंग नाईक या माजी संचालकांचे नाव पुढे आहे. मात्र राजेश राठोडदेखील या गटातून इच्छुक आहेत.

...........

चौकट

चाळीसगावातून ७८ सोसायट्यांचे ठराव

चाळीसगाव तालुक्यातील ८१ पैकी ७८ विविध कार्यकारी सोसायट्यांचे ठराव सहा महिन्यांपूर्वीच पाठविण्यात आले. कळमडू, वरखेडे बु. व नांद्रे येथील सोसायट्यांवर प्रशासक असल्याने येथील ठराव झालेले नाही.

...... इन्फो सोसायटी गटात उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसची चाचपणी सुरू आहे. मी स्वतः इतर सहकारी संस्था किंवा ओबीसी गटातून उमेदवारीसाठी इच्छुक आहे. सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधत असताना काँग्रेसला जागांबाबत योग्य न्याय न मिळाल्यास सर्व १५ जागा लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही उमेदवारांची चाचपणी सुरूही केली आहे.

- अशोक खलाणे

प्रदेश सचिव, काँग्रेस ओबीसी सेल

Web Title: In the election arena of the district bank, there is a rush for candidature among the rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.