एटीएममध्ये छेडछाड करुन एक कोटीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:55+5:302021-01-24T04:07:55+5:30

जळगाव : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कजगाव (ता. भडगाव) व इतर सहा बँकांच्या एटीएममध्ये छेडछाड व पासवर्डचा गैरवापर करुन ...

Embezzlement of Rs 1 crore by tampering with ATMs | एटीएममध्ये छेडछाड करुन एक कोटीचा अपहार

एटीएममध्ये छेडछाड करुन एक कोटीचा अपहार

Next

जळगाव : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कजगाव (ता. भडगाव) व इतर सहा बँकांच्या एटीएममध्ये छेडछाड व पासवर्डचा गैरवापर करुन १ कोटी ७ ला‌ख १ हजार ७०० रुपयांचा अपहार करणाऱ्या रोशन बाळासाहेब अहेर (२८, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) व महेश शंकरराव सानप (रा. चाळीसगाव) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली.

आरसीआय कॅश मॅनजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि., पवई, मुंबईचा संचालक सुदीप नारायण रमाणी (रा. मुंबई) हा देखील या गुन्ह्यात आरोपी असून, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

एटीएममध्ये पैसे पुरवणाऱ्या मे. इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिसेस प्रा. लि.चे अधिकारी दीपक दौलत तिवारी (रा. जळगाव) यांनी २६ ऑक्टोबर २०१६ रोजी भडगाव पोलीस ठाण्यात याविषयीची फिर्याद दिली आहे. दिनांक १३ एप्रिल २०१५ ते २१ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत तिघांनी कजगाव येथील सेंट्रल बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड व पासवर्डचा गैरवापर करुन १५ लाख १ हजार ७०० रुपयांचा अपहार केला. त्याशिवाय मेहुणबारे हद्दीत ३९ लाख ८५ हजार २०० रुपयांचा, पाचोरा येथे ४ लाख ८७ हजार ६०० रुपयांचा, चाळीसगावात ८ लाख ६८ हजार १०० रुपयांचा, चाळीसगाव ग्रामीणमध्ये ३० लाख ५३ हजार ५०० रुपयांचा, सावदा येथे ३ लाख २५ हजार ३०० रुपयांचा व पारोळा येथे ५ लाख ५९ हजार ८०० रुपयांचा असा एकूण १ कोटी ७ लाख रुपयांचा अपहार या तिघांनी केल्याचे उघड झाले असून, सात पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग

अपहाराची व्याप्ती लक्षात घेता, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी उपनिरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार मसूद शेख व कॉन्स्टेबल नितीन सपकाळे यांच्याकडे तपासाची सूत्र सोपवली. या पथकाने रोशन अहिरे व महेश सानप यांचा शोध घेऊन शुक्रवारी अटक केली तर संदीप रमाणी अद्याप हाती लागलेला नाही. दरम्यान, अटकेत असलेल्या दोघांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कस्टोडीयननेच केला घात

एटीएमच्या सुविधेबाबत ईपीएस कंपनीने बँकेशी करार केलेला आहे. त्यानुसार आरसीआय कंपनीने हे टेंडर घेतले होते. त्यात रोशन व महेश या कस्टोडीयनकडे एटीएममध्ये पैसे लोड करण्यासह इतर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्याकडे पासवर्डसह इतर तांत्रिक माहिती होती.

कोट...

या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. अटकेतील दोघांनी पैशाची विल्हेवाट कशी लावली, यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची माहिती घेतली जात आहे. बँकांची खाती तपासली जाणार आहेत. या आरोपींविरुध्द आणखी सहा पोलीस ठाण्यात अपहाराचे गुन्हे दाखल आहेत. मुख्य संशयित फरार आहे.

- संदीप पाटील, तपास अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा

Web Title: Embezzlement of Rs 1 crore by tampering with ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.