तब्बल ७०२ लाभार्थी दाखवून साडे सहा कोटीचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 08:49 PM2020-11-25T20:49:18+5:302020-11-25T20:49:18+5:30
बँकेचे दोन्ही कर्मचारी दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग : एजंट, बँक व महामंडळाचे कर्मचारी रडारवर
जळगाव : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून अर्थ सहाय्य घेताना बोगस लाभार्थी दाखवून महामंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांनी हातमिळवणी साडे पाच लाखाच्या अपहराचे प्रकरण समोर आले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा साडे सहा रुपयांच्या घरात असून त्यात ७०२ बोगस लाभार्थी दाखविण्यात आले आहेत. यात महामंडळ व बँकांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एजंट चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. दरम्यान, अटकेतील स्टेट बँकेचा सहायक जयेश रघुनाथ सोनार, सेट्रल बँकेच्या कर्मचारी सुनंदा बाबुराव तायडे या दोघांना बुधवारी आणखी दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर प्रकाश लक्ष्मीकांत कुळकर्णी (रा.राधाकृष्ण नगर), सागर विनायक पत्की व अमरिश अनिल मोकाशी या दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली अनिश जाधव यांनीही अपहाराबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात गुन्ह्यात तायडे व सोनार यांना वर्ग करण्यात आले आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत हा अपहार झाला आहे. याप्रकरणी २ ऑगस्ट २०१९ रोजी हा गुन्हा दाखल झाला होता. यात बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दलालांना हाताशी धरुन एकाचा फोटो दुसऱ्याच्या आधारकार्डवर, पत्ता तिसऱ्याचाच अशा प्रकारचे तब्बल ७०२ बोगस प्रकरणे तयार करुन बीज भांडवल योजनेंतर्गत साडे सहा कोटी रुपयांचा अपहार केला. या गुन्ह्यात यापूर्वी जिल्हा व्यवस्थापक खंडू विठोबा लोहकरे (४६,रा,नाशिक), लेखापाल सागर वसंत अडकमोल (३९,रा.महाबळ) या दोघांना ४ व ७ नोव्हेंबर २०१९ रोजी अटक झाली होती.मुकेश देवराम बारमासे (रा.नागपूर) याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. प्रकाश लक्ष्मण कुळकर्णी (रा.राधाकृष्ण नगर) यालाही यात आरोपी करण्यात आले आहे.
जिल्हा व्यवस्थापक व लेखापालाचे कारनामे
पोलिसांनी केलेल्या तपासात माजी जिल्हा व्यवस्थापक खंडू विठोबा लोहकरे व लेखापाल सागर वसंत अडकमोल यांनी दलालाला हाताशी धरुन भुसावळातील बोगस लाभार्थी दाखविले आहेत. जे लाभार्थी अस्तित्वातच नाही तर काहींचे काल्पनिक नाव य पत्ते वापरले आहेत.बीज भांडवल व अनुदानाचे अनुक्रमे १० हजार व ९० हजार रुपयांचे धनादेश तयार करुन स्टेट व सेंट्रल बँकेतून क्लीअर करुन दलालांनी दिलेल्या यादीतील २३ जणांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे उघड झाले आहे.
तीन जणांच्या वैयक्तिक खात्यात वर्ग झाली रक्कम
महात्मा फुले विकास महामंडळ यांनी प्रत्यक्षात चार धनादेशाद्वारे २ लाख ४० हजार रुपयांचे धनादेश असताना देखील त्यांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडीया या बँकेच्या जळगाव शाखेतून ५ लाख ४० हजार रुपये इतकी रक्कम काढण्यात आली. ही रक्कम अमरीश मोकाशी याच्या खात्यावर ५० हजार रुपये, संजीव सोनवणे याच्या खात्यावर पाच वेळा ७० हजार व एक वेळा ५० हजार रुपये तर सागर पत्की याच्या खात्यावर एक वेळा २० हजार तर दुसऱ्यावेळा ७० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
जिल्हा पेठला दाखल असलेल्या एका गुन्ह्यात बिज भांडवल योजनेंतर्गत करण अरुण बागरे (रा.भुसावळ), समाधान एकनाथ तिलोरे (रा.तांबापुरा) व परमवीर सुनील आठवले (रा.तांबापुरा) या तिघांना बनावट लाभार्थी दाखवून २ लाख ४० हजार रुपयांचा अपहार झाल्याचे प्रथमच्या चौकशीत उघड झाले आहे. मुळात मागासवर्गीय लोकांसाठीच ही योजना असताना यात बिगर मागासवर्गीय लाभार्थी दाखविण्यात आले असून एका एजंटने तर महामंडळाच्या कार्यालयातच कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन बिगरमागावर्गीय लाभार्थ्याला मागासवर्गीय दाखविले. ज्या लाभार्थीच्या खात्यात ही रक्कम जमा झाली, त्यांना भेटून तुमच्या खात्यावर आमचे पैसे जमा झाले आहेत असे सांगून या लोकांना पाच ते दहा हजाराचे आमिष दाखवून ही रक्क्कम काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
कोट..
या गुन्ह्याची व्याप्ती वाढत चालली आहे. ७०२ बोगस लाभार्थी दाखवून साडे सहा कोटीचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. यात अटकेतील दोन्ही बँक कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे तर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीत अजून काय निष्पन्न होते, त्यावर पुढील कारवाई अवलंबून आहे.
-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा