खाऊ गल्लीत विक्रेत्यांनी अडविला रस्ता
जळगाव : मनपा इमारतीलगत असलेल्या खाऊ गल्लीत सायंकाळी विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत आहेत. मात्र, हे विक्रेते रस्त्यातच टेबल-बाक उभे करत असल्यामुळे नागरिकांना गोलाणी मार्केटच्या पाठीमागे जाण्यासाठींही रस्ता शिल्लक राहत नसल्याचे प्रकार घडत आहे.त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
मनपा समोरील बेवारस वाहने उचलण्याची मागणी
जळगाव : मनपा इमारतीसमोर गेल्या काही महिन्यांपासून दोन कार बेवारसपणे उभ्या आहेत. यामुळे इतर वाहनांना वाहने उभी करण्यास, अडथळा निर्माण होत आहे. तसेच बेवारस कारवर मोठ्या प्रमाणावर धूळ साचल्यामुळे, व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या बेवारस वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.
कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे आरोग्य धोक्यात
जळगाव : शहरातील नवीपेठेत अनेक ठिकाणच्या गल्ली बोळात नियमित साफसफाई होत असल्यामुळे, व्यावसायिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच गटारींही तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
स्वच्छतागृह उभारण्याची मागणी
जळगाव : जिल्हा परिषद व तहसील कार्यालय परिसरात कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत परिसरातील काही व्यावसायिकांनी मनपा प्रशासनाकडे मागणीही केली होती. मात्र, अद्याप मनपा प्रशासनातर्फे या ठिकाणी स्वच्छतागृह उभारले नसल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी
जळगाव : सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाही एसटी महामंडळाचे कर्मचारी नियमितपणे सेवा बजावित आहेत. चालक-वाहकांचा दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासात नागरिकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महामंडळाने या एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याची
मागणी इंटक संघटनेचे सचिव नरेंद्रसिंह राजपूत यांनी कामगार अधिकाऱ्यांकडे केली आहे.
भारनियमन बंद करण्याची मागणी
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे दररोज भारनियमन होत असल्यामुळे, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे महावितरणने हे भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महावितरणच्या कार्यकारी अभियंता सी. एन. चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनोज चौधरी, प्रमोद घुगे, चंद्रकांत पाटील, भिकन सोनवणे, धनराज जाधव, भाऊसाहेब सोनवणे, सचिन माळी, रवींद्र कोळी, महेश महाजन, गजू परदेशी उपस्थित होते.