मेहरूण तलाव परिसरातील डेरेदार वृक्ष धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:16 AM2021-02-13T04:16:42+5:302021-02-13T04:16:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव व परिसरातील निसर्ग सौदर्यांकडे मनपा प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केलेले ...

Endangered trees in Mehrun Lake area in danger | मेहरूण तलाव परिसरातील डेरेदार वृक्ष धोक्यात

मेहरूण तलाव परिसरातील डेरेदार वृक्ष धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव व परिसरातील निसर्ग सौदर्यांकडे मनपा प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. तलावाच्या पुर्वेकडील भागात सुमारे ३० ते ४० वर्ष जुन्या व डेरेदार वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मनपाच्या सुशोभिकरणाच्या नादात अनेक वृक्षांमधील माती व मुरुम काढून दुसरीकडे वापरला जात असल्याने अनेक वृक्षांचे मुळं उघडी झाली आहेत. त्यामुळे लहानशा वादळात देखील हे वृक्ष कोसळण्याची भिती आहे.

गेल्याच आठवड्यात गणेश घाटाच्या बाजुला सुमारे १०० वर्ष जुने निंबाचे वृक्ष कोसळले होते. या वृक्षांच्या कोसळण्यामागे देखील हेच कारण असू शकते. वृक्षाच्या एका बाजूस खोदकाम झाल्याने वृक्षाची एक बाजू उघडी पडत आहे. अनेक वृक्षांच्या एका बाजुचे मुळं दिसू लागली आहेत. यामुळे वादळ आल्यास हे वृक्ष कोसळण्याची भिती आहे. तसेच वादळाने नाही तर एकनाएक दिवस हे वृक्ष एका बाजुने झुकून कोसळण्याची शक्यता आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेचे वृक्षमित्र अजीम काझी हे या भागाता पाहणीला गेले असता, त्यांना ही बाब लक्षात आली आहे.

वृक्षांकडे लक्ष देण्याची गरज

‘लोकमत’ च्या टीमने या भागात जावून पाहणी केली असता, सुमारे २० वृक्षांचे मुळं उघडी पडली आहेत. त्यातच याठिकाणी खोदकाम झालेले असण्याची शक्यता आहे. यासह सर्व वृक्ष ही सुमारे २० ते ३० वर्ष जुनी असण्याचीही शक्यता आहे. मनपाने गेल्या दोन वर्षात मेहरूण तलाव परिसरात १० हजार वृक्षांची लागवड केली. मात्र, त्यापैकी २० टक्केच वृक्षच जगू शकली आहेत. अशा परिस्थितीत एका वृक्षाला जगविण्यासाठी अनेक वर्ष वृक्षांची निगा ठेवली जाते. तेव्हा हे वृक्ष आकाराला येत असते, अशीच डेरेदार वृक्ष आज धोक्यात आहेत. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. मेहरूण तलाव परिसरातील या वृक्षांना क्रमांक देखील देण्यात आले आहेत.

वृक्ष प्राधिकरण समिती नावालाच

मनपात वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, समिती नावालाच दिसून येत आहे. मेहरूण भागात अनेक वृक्ष जगू शकली नाहीत. तसेच अनेक डेरेदार वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शहरात अनेक वृक्षांची कत्तल केली जात आहे. मात्र, मनपाची वृक्ष प्राधिकरण समिती मनपाच्या कार्यालयातच बसून बैठकांचा सोपस्कार पार पाडताना दिसून येत आहे. शहरभरातील वृक्षांची काय स्थिती आहे ?, पर्यावरण प्रेमींची मागणी काय आहे ? या बाबींकडे लक्ष द्यायला देखील या समितीतील सदस्यांना वेळ नाही. केवळ जुलै महिन्यात वृक्ष लागवड करायलाच समितीचे सदस्य पुढाकार घेतात मात्र त्या वृक्षांचे जतन करण्यास कोणताही सदस्य व मनपातील अधिकारी देखील पुढे येत नाही. त्यामुळे मेहरूण तलाव भागातील अस्तित्व हरवत जाणाऱ्या वृक्षांच्या संवर्धनाकडे लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

कोट...

मेहरूण तलावाचे बाह्य रुप विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. मात्र, या तलावाचे वैभव ज्या गोष्टींवर अवलंबून आहे. त्या घटकांकडे लक्ष दिले जात नाही. तलाव परिसर सुशोभित केला पाहिजे. मात्र, हे सुशोभिकरण करताना तलाव परिसरातील जैवविविधततेकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.

-बाळकृष्ण देवरे, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था

Web Title: Endangered trees in Mehrun Lake area in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.