डोळ्यासमोर प्रवेशद्वार बंद झाले आणि सोन्यासारखी संधी हुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:27+5:302021-03-22T04:15:27+5:30
जळगाव : कोरोनामुळे एक तर वर्षभरानंतर होणारी परीक्षा व त्यासाठी घरी राहून केलेली संपूर्ण तयारी आणि उत्तीर्ण होण्याची असलेली ...
जळगाव : कोरोनामुळे एक तर वर्षभरानंतर होणारी परीक्षा व त्यासाठी घरी राहून केलेली संपूर्ण तयारी आणि उत्तीर्ण होण्याची असलेली खात्री असतानाही केवळ रिक्षातून उतरत असताना परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार बंद झाले आणि आयुष्यातील महत्त्वाची संधी हुकल्याचा प्रसंग रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या परीक्षार्थीवर ओढवला. प्रवेशद्वार बंद करू नका, मला प्रवेश द्या, अशा विनवण्या करूनही कोणी दखल घेत नसल्याने या परीक्षार्थीला अश्रू अनावर झाले. दरम्यान, रविवारी झालेल्या या परीक्षेच्या वेळीच कोरोनाची लागण झाली तरी त्याची तमा न बाळगता जळगावातील एका केंद्रावर कोरोनाबाधित रुग्णाने ही परीक्षा दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी झाली. सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रात झालेल्या या परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात सकाळी ९.३० वाजेपर्यंत प्रवेश दिला जाणार होता. त्यानुसार सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान धरणगाव येथील मनिषा विश्वास भालेराव ही परीक्षार्थी रिक्षामधून ला.ना. सार्वजनिक विद्यालय या परीक्षाकेंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच उतरत होती. त्याच वेळी प्रवेशद्वार लावले जात असल्याचे त्यांना दिसले. त्या वेळी तिने आवाज देत प्रवेशद्वाराकडे धाव घेतली व प्रवेश देण्याविषयी विनंती केली. मात्र कर्मचारी ऐकत नसल्याने समोर असलेल्या केंद्र संचालकांनाही आवाज देत विनवण्या केल्या. मात्र त्यांनी मागे वळूनही पाहिले नाही व कर्मचाऱ्याला प्रवेशद्वार लावून घेण्यास सांगितले, असे सदर परीक्षार्थीने सांगितले.
अर्धा तास केल्या विनवण्या
आयुष्यातील ही महत्त्वाची परीक्षा असल्याने व आता पुुन्हा कधी संधी मिळणार या विचाराने मनिषा यांनी या ठिकाणी अर्धा तास विनवण्या केल्या. कोणीच ऐकून घ्यायला तयार नसल्याने त्यांचे डोळे पाणावले. या वेळी तेथे तैनात असलेल्या पोलिसांनीही सदर परीक्षार्थीला प्रवेशद्वारापर्यंत येण्यास केवळ सेकंदाचा फरक पडला आहे, त्यामुळे त्यांना प्रवेश द्या, असे सुचविले. मात्र तरीदेखील उपयोग झाला नाही.
निवृत्त शिक्षणधिकाऱ्यांची भाची
परीक्षेला मुकलेल्या मनिषा या निवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या भाची आहेत. त्यांना प्रवेश मिळत नसल्याने त्यांनी हिंगोणेकर यांच्याशी संपर्क साधून आपबिती सांगितली. त्या वेळी केंद्रसंचालकांना बोलण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिल्याचे सांगण्यात आले.
घरी राहून केला अभ्यास, मात्र संधी हिरावली
मनिषा भालेराव या नोकरीला असून कोरोनामुळे घरूनच काम करीत आहे. या दरम्यान त्यांनी घरी अभ्यास करून परीक्षेची पूर्ण तयारी केली. त्यामुळे यावेळी आपण परीक्षा उत्तीर्ण होऊ, असा त्यांना विश्वास होता. मात्र डोळ्यासमोर परीक्षा केंद्र दिसत असताना परीक्षा देता आली नाही, असा प्रसंग ओढवल्याने त्या पूर्णपणे खचल्या. सध्या कोरोनाचा काळ असल्याने वाहन मिळत नाही, काही समस्या उद्भवतात, याचाही येथे विचार होऊ शकला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सेकंदाचा विचार करता, विद्यार्थ्यांच्या वेळेचे काय?
रविवारी एकूण तीन जण परीक्षेपासून वंचित राहिले. मनिषा भालेराव यांच्यानंतरही पाच-सहा मिनिटांनी इतर दोन जण आले होते. त्यांनाही प्रवेश मिळाला नाही. १४ मार्च रोजी होणारी परीक्षा सरकारने स्थगित केली. त्यानंतर आंदोलन झाले व आठवडाभरानंतर ही परीक्षा झाली. यात विद्यार्थ्यांचा आठवडा गेला, त्याची किंमत नाही का, असा सवाल शशिकांत हिंगोणेकर यांच्यासह परीक्षार्थींनी उपस्थित केला आहे.