लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेल्या मृत्यूसंख्येमुळे औद्योगिक वसाहत परिसरात नवीन स्मशानभूमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्यानंतर उद्योजक चांगलेच धास्तावले आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता एमआयडीसीत स्मशानभूमी करायला विरोध नाही, केवळ जागा बदलावी, असे उद्योजकांनी महापालिकेला सांगितले असून स्मशानभूमीसाठी लागणारी आवश्यक ती मदत करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान, शनिवारी स्मशानभूमीचे काम थांबले होते.
शहरात कोरोना रुग्णांची व त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने मनपा प्रशासनाने एमआयडीसी परिसरात नवीन स्मशानभूमी तयार करण्याच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात केली. हे काम करीत असताना याविषयी उद्योजकांना काहीही माहीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. स्मशानभूमीचे काम ज्या ठिकाणी केले जात आहे त्याला लागूनच असलेल्या प्लास्टिक उद्योगाचे मालक अशोक मुंदडा यांनी सांगितले की, कोरोनाच्या गंभीर स्थितीत स्मशानभूमीला विरोध नाही. मात्र, जागा बदलली गेली पाहिजे, अशी मागणी आहे. ही जागा निवडताना उद्योजकांना विश्वासात घेतले नसून त्यांच्याशी चर्चादेखील केली नाही. जी सेक्टरमधील मोकळ्या जागेत स्मशानभूमीचे हे काम सुरू असून, या जागेच्या आजूबाजूला लागूनच कंपन्या व काही जणांची निवासस्थाने आहेत. या ठिकाणी लागूनच स्मशानभूमी होत असल्याने उद्योजक धास्तावले असून, कामगारदेखील यामुळे कंपनीत येण्यासाठी धजावणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर उद्योजक अशोक मुंदडा व इतर उद्योजकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्मशानभूमी या ठिकाणी न करता एमआयडीसीमध्ये इतर जागा पाहाव्यात, अशी विनंती केली. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तीन ते चार ठिकाणी जागा पाहिल्या असून आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी महापालिकेचे काही अधिकारी स्मशानभूमीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आले होते. त्यावेळी मुंदडा व इतर उद्योजकांनी त्यांच्याशी चर्चा केली व जागा बदलण्याची मागणी केली.
उद्योजक करणार हवी ती मदत
सध्या कोरोनाचे संकट असून या काळात मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील वाढत असल्याने अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उद्योजकदेखील सहकार्य करण्यास तयार आहेत. शिवाय एमआयडीसीमध्ये स्मशानभूमी करण्यास उद्योजकांचा विरोधदेखील नाही. मात्र, ज्या ठिकाणी सध्या स्मशानभूमीचे काम केले जात आहे तेथे लागूनच कंपन्या असल्याने ही जागा बदलण्यात यावी अशी मागणी उद्योजकांची आहे, असे देखील अशोक मुंदडा यांनी सांगितले. याशिवाय आवश्यक ती मदत करण्यास उद्योजक तयार आहेत, असेदेखील सांगण्यात आले.
यासंदर्भात मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.