१० महिन्यांनंतरही शेडचे काम रखडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 03:29 PM2020-12-09T15:29:29+5:302020-12-09T15:30:50+5:30
सभामंडपाचे काम अर्धवट झाल्याने पूर्ण करण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.
चंद्रमणी इंगळे
हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथे श्री चक्रधर स्वामी पर्यटन स्थळ विकास व वन विभाग अंतर्गत सभामंडपाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या १० महिन्यांपासून केवळ सभामंडपाचे ओटा बांधून ठेवला असल्याने अर्धवट काम केव्हा पूर्ण होणार? वरील शेडचे काम कोण करणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. सभामंडपाचे काम अर्धवट झाल्याने पूर्ण करण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.
यासंदर्भात वेळेस संबंधितांच्या लक्षात आणूनदेखील काम पूर्ण न झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी ‘लोकमत’कडे मांडली. यासंदर्भात पंचायत समितीच्या माजी उपसभापतींनी आमदार चंद्रकांत पाटील यांनादेखील कळवले होते. त्यांनी संबंधित विभागाला वेळोवेळी सांगून काम रखडलेलेच दिसत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त होत आहे. दोन वेळेस संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चादेखील केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले होते. याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. सुरुवातीचे काम जीर्ण झाल्यावर पूर्ण केले जाणार काय, असा प्रश्न यांनी उपस्थित केला होता, असे असूनदेखील कोणतीच हालचाल येथे झालेली नसल्याचे सांगण्यात आले.
येथे पर्यटकांच्या सोयीसाठी हे पत्री शेड मंजूर झाले आहे. परंतु केवळ ओटाच बांधून ठेवल्याने वरील संपूर्ण काम बाकी आहे. त्यामुळे या कामाचे घोडे कुठे नडले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्धवट कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. लॉकडाऊननंतर हळूहळू काही महिन्यांपूर्वी कामे सुरू झाली असताना पर्यटन सुरू होण्याची शक्यता असताना ही बाब लक्षात घेता लवकरात लवकर येथे पर्यटन शेडचे काम करीत करावे, अशी मागणी प्रशांत शेळके, अमोल देशमुख, शांताराम निकम यासह गावकऱ्यांनी केली आहे सुविधांसाठी त्वरित काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.