फेर लिलावातही १३ वाळू गटांना प्रतिसाद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:50+5:302021-03-06T04:15:50+5:30
जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांचे लिलाव झाल्यानंतर उर्वरित १३ वाळू गटांच्या फेर लिलाव प्रक्रियेची मुदत संपली ...
जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांचे लिलाव झाल्यानंतर उर्वरित १३ वाळू गटांच्या फेर लिलाव प्रक्रियेची मुदत संपली तरी एकही निविदा न आल्याने या वाळू गटांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रतिसादाअभावी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने या वाळू गटांची किंमत २५ टक्क्याने कमी करून पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील वाळूला मोठी मागणी असल्याने येथे नेहमीच वाळूची वाहतूक सुरू असते. त्यात गेल्या वर्षी कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान कामे ठप्प झाली होती. त्यात नंतर पर्यावरण समितीची परवानगी मिळत नसल्याने वाळू गटांचे लिलाव होऊ शकत नव्हते. अखेर जिल्ह्यातील २१ वाळू गटांच्या लिलावाला समितीची परवानगी मिळाली खरी मात्र लिलाव प्रक्रियेत केवळ बांभोरी, घाडवेल, आव्हाणी, नारणे, वैजनाथ, टाकरखेडा, उत्राण १, उत्राण २ या आठ वाळू गटांनाच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रतिसाद न मिळालेल्या जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यातील धावडे, सावखेडा या गसाठी फेर लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यात ५ मार्चपर्यंत निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र या वाळू गटांसाठी प्रतिसादच मिळाला नाही.
किंमत होणार कमी
१३ वाळू गटांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची हातची किंमत कमी होऊ शकते. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वाळू गटांची २५ टक्क्याने किंमत कमी होऊन पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.