बाजारपेठ बंदच्या दुसऱ्या दिवशीही नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:53 AM2020-09-07T11:53:02+5:302020-09-07T11:57:41+5:30
ठिकठिकाणी लागले दुकान
जळगाव : सम-विषम पद्धत बंद करीत सर्व दुकानांसह व्यापारी संकूलही सुरू करण्यास परवानगी देताना शनिवार व रविवार बाजारपेठ बंद करण्याचे आदेश असले तरी याच्या अंमलबजावणीच्या दुसºया दिवशी रविवार, ६ सप्टेंबर रोजीदेखील शहरात नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र होते. यामध्ये महात्मा फुले मार्केट समोर तसेच वेगवेगळ््या ठिकाणी कापड, चप्पल विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. या सोबतच मास्क न वापरता शहरात फिरणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असलेल्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले. यामध्ये शहरातील व्यापारी संकूलही बंद होते. त्यानंतर व्यापारी संकूल वगळता इतर दुकाने सम-विषम विषम पद्धतीने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली व नंतर व्यापारी संकूलही सुरू झाले. त्यात गेल्या आठवड्यात ३१ आॅगस्टपासून सम-विषम पद्धत बंद करीत सोमवार ते शुक्रवार पूर्णवेळ दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार आता शनिवार व रविवार वगळता इतर दिवस दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यात आली. यात शनिवार व रविवार केवळ जीवनावश्यक वस्तूंच्याच दुकाना सुरू राहणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिले.
असे असतानाही गेल्या दोन दिवसांपासून शहरात हे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र आहे. एरव्ही सुरुवातीपासूनच रविवारी शहरातील बहुतांश दुकाने बंदच असतात. त्यामुळे बाजारपेठेत कोणी येत नाही. मात्र सध्या नियम ठरवून दिल्यानंतर आलेल्या रविवारी व्यापारी संकुलांमधील दुकाने व जीवनावश्यक वस्तूंच्या इतर दुकाना बंद असताना महात्मा फुले मार्केट समोर, अजिंठा मार्गावर, शहरातील वेगवेगळ््या परिसरात कापड, चपला, खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटून व्यवसाय सुरू ठेवला.
शनिवारीदेखील असेच चित्र शहरात विविध भागात होते. दोन दिवसांपासून रस्त्यावर दुकाने थाटली जात असली तरी मनपाच्या पथकाकडून कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बाजारपेठ बंद असताना वर्दळ कायम
कोरोनाच्या संसर्गाला आळा बसावा म्हणून दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय असला तरी बाहेर फिरणाºयांची गर्दी काही कमी झाली नाही. बाजारपेठ बंद असल्याने काय खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
मास्कचा वापर करण्यास टाळाटाळ
मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला असून मास्क न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. असे असले तरी शहरात अनेक जण अजूनही मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. रविवारीदेखील शहरात अनेक वाहनधारक विनामास्क फिरत असल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांना रोखत कारवाई केली.