लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यातील आरोग्य विभागातील विविध रिक्त पदांसाठी २०१९ मध्ये जाहिरात निघाली होती. या पदभरतीसाठी दीड वर्षांनी मुहूर्त मिळाला असून येत्या २८ फेब्रुवारीला जिल्ह्यातील हिवताप विभागाच्या ५९ पदांसाठी १४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. २०१९ साली ऑनलाईन् अर्ज केलेल्या उमेदवारांनाच या परीक्षेला बसता येणार असून असे ६ हजार ८१२ उमेदवार ही परीक्षा देणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेत अनेक पदे रिक्त असल्याने वैद्यकीय सेवेवर त्याचा परिणाम होत होता. मनष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दा कोरेाना काळातही प्रकर्षाने समोर आला होता. त्यावेळी कंत्राटी पद्धतीने काही कालावधींसाठी विविध पदे भरून ही मनुष्यबळाची कमतरता भरून काढली होती. मात्र, २०१८ साली राज्यातील साडेपाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जाहिरात काढण्यात आली होती. मात्र, ही भरतीप्रक्रियाच लांबल्याने ही पदे कमी करून साडे तीन हजारांवर आली होती. यात जिल्ह्यातील हिवताप विभागाची बहुद्देशी आरोग्य कर्मचारी अशी पदे ५९ होती. मात्र, काही कालावधीनंतर ही पदे घटविण्यात आली होती. दरम्यान, परीक्षेचे पूर्ण नियोजन एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. केवळ प्रश्नपत्रिक बनविणे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे, उत्तरपत्रिका गोळा करणे ऐवढी शासनाची भूमिका राहणार आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या सुरक्षेसाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तही मागविण्यात येणार आहे. १४ केंद्रांवर वीस पर्यवेक्षक राहणार आहे. सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात ही परीक्षा होणार असून यानंतर गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड होणार आहे. या पदांसाठी मुलाखती नसल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.