खडसे यांच्या भाजप सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या वृत्ताने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 07:40 PM2020-10-18T19:40:57+5:302020-10-18T19:41:10+5:30
प्रदेशाध्यक्ष व खडसे यांच्याकडून इन्कार : सीमोलंघनासाठी आता गुरुवारचा मुहूर्त
जळगाव : भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने रविवारी राज्यात चांगलीच खळबळ उडाली. या वृत्ताचा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व स्वत: खडसे यांनी इन्कार केला आहे. दुसरीकडे येत्या गुरुवार दि. २२ रोजी खडसे यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे.
खडसे यांच्या गुरुवारी होणाऱ्या प्रवेशाबाबत राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाºयाने दुजोरा दिला आहे.
दरम्यान, प्रवेश सोहळ्याचा संदेश जवळच्या आणि विश्वासू कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. यासाठी मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते मुबंई जाण्याच्या तयारीला लागले आहेत.
रविवारी दुपारी खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
याअगोदर खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा होती. ते शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी पक्षांतराबाबत ‘नो कॉमेंटस’ असे उत्तर दिल्याने त्यांच्या सीमोल्लंघनाबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते आता हे सीमोल्लंघन गुरुवारी होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
रावेर येथील चार अल्पवयीन मुलांच्या हत्येची घटना शुक्रवारी घडली होती. या ठिकाणी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेले गृहमंत्री अनिल देशमुख व एकनाथराव खडसे हे एकाच वाहनातून पोहचले होते. दरम्यान या दोघांमध्ये बंद द्वार चर्चाही झाली. यानंतर गुरुवारच्या मुहूर्ताची तारीख जवळपास निश्चित झाली आहे.
कोट
एकनाथराव खडसे यांच्या पक्ष सदयत्वाच्या राजीनाम्याविषयी मला माहिती नाही. त्यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
कागट
आपण भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मीडियावालेच मुहूर्त ठरवित आहेत.
- एकनाथराव खडसे, भाजप नेते.