जळगाव : जळगाव जिल्हा नियोजन समितीला साह्य करण्यासाठी सरकारने नवीन कार्यकारी समिती नियुक्त केली आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील हे या नव्या समितीचेही अध्यक्ष असणार आहेत.
महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियम १९९८ च्या कलम ११ तील तरतुदीनुसार जिल्हा नियोजन समितीला साह्य करण्यासाठी समिती अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कार्यकारी समिती नियुक्त करण्याचे स्पष्ट केले गेले आहे. तसेच या नव्या समितीत जिल्हा नियोजन समितीतील नामनिर्देशित सदस्यांपैकी दोन सदस्य, तसेच विशेष निमंत्रित सदस्यांपैकी दोन सदस्य नियुक्त करण्याचीही तरतूद आहे. त्यानुसार समितीचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिफारस केल्यानुसार नव्या कार्यकारी समितीत चार जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात विधानसभा सदस्य चंद्रकांत पाटील, शिरीष चौधरी यांची नामनिर्देशित सदस्य कोट्यातून, तर विधानसभा सदस्य किशोर पाटील, अनिल पाटील यांची विशेष निमंत्रित सदस्य कोट्यातून नियुक्ती केली गेली आहे. ही समिती नऊ सदस्यांची असून, यात नाशिकचे विभागीय आयुक्त, जळगावचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अन्य सदस्य आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी या नव्या कार्यकारी समितीचे संयोजक असणार आहेत.