रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे अवाजवी वीज बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 03:14 PM2019-06-02T15:14:15+5:302019-06-02T15:17:17+5:30
रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे अवाजवी वीज बिले येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
भुसावळ, जि.जळगाव : रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे अवाजवी वीज बिले येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. दरम्यान, या प्रकाराविरुद्ध ग्राहकांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.
अचूक मीटर वाचन व्हावे या उद्देशाने मानवी हस्तक्षेप टाळत महावितरणने अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ या निर्णयाची भुसावळ परिसरात अंमलबजावणी सुरू झाली असून जवळपास ४० हजार मीटर बदलून नवे मीटर बसविण्यात येणार आहेत.
नवीन मीटर फास्ट फिरते
वीज ग्राहकाने जेवढ्या युनिटचा वापर केला आहे तेवढ्याच युनिटची आरएफ तंत्रज्ञानामुळे थेट महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंद होऊन वीजग्राहकाला अचूक वीजबिल दिले जाईल, असे सांगितले जाते. परंतु जुन्या वीज मीटरमध्ये वेळ, दिनांक, व्होल्टेज, वापर व इतर बाबी स्पष्ट दिसत होत्या. त्या या नवीन मीटरमध्ये लॉक केलेल्या आहे. तसेच नवीन मीटर वापर कमी असल्यावरसुद्धा युनिट जास्त घेत आहेत, नेहमीपेक्षा ४० टक्के टक्के जास्त वीज बिल आले आहे, अशा बाराशेपेक्षा जास्त तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत, असा दावा भुसावळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
चोरी होणाºया भागात मीटर बदलले नाही
ग्राहकांनी या बदलाची नोंद घेऊन वीजमीटर बदलण्यास महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले, पण आतापर्यंत वीज चोरी होणाºया भागात नवीन मीटर बसवले गेले नाही. फक्त सर्व सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड होईल अशाच प्रकारे कार्यवाही सुरू आहे. विशेष म्हणजे मीटर बदली करताना महावितरणचा कोणताही कर्मचारी उपस्थित नसतो.
सहा महिन्यांनी पुन्हा प्रीपेड मीटर येणार
वीजचोरी रोखण्यासाठी आता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं घरात प्रीपेड मीटर लावणे सक्तीचे केले आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंतची मुदत दिली आहे. पुढील तीन वर्षांत ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’नेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे. महाराष्ट्रात पुढील सहा महिन्यात पुन्हा नवीन वीज मीटर येतील, मग हा नसता उठाठेव कशासाठी? कोणत्या नेत्याचे घर भरले जात आहे? यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका येत आहे, अशी भावना शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केली आहे. यासाठी ग्राहकांचे अभिप्राय मागवले असून एकत्र लढा उभारण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर प्रणाली भुसावळसह पाचोरा, धरणगाव या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे मीटरमध्ये कोणतीही छेडछाड झाल्यास लगेच मुख्य कार्यालयात आॅनलाईन पद्धतीने कळते. पूर्वी मॅन्युअल सिस्टम प्रणाली होती. आता रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे वीज चोरीस आळा बसेल.
- प्रदीप घोरूडे, कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, भुसावळ