जळगाव : कोरोनाच्या कारणामुळे पोलीस बदल्यांना देण्यात आलेली स्थगितीची मुदत बुधवार ३० जून रोजी संपली आहे. त्यामुळे नवीन काय आदेश येतो याकडे बदलीपात्र पोलिसांच्या नजरा लागलेल्या आहेत. येत्या दोन दिवसांत बदल्यांचे गॅझेट निघेल, अशीही चर्चा सध्या जोरात आहे. दुसरीकडे आपली माहिती तयार आहे, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे काय आदेश येतात, त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश ज्या दिवशी निघाला त्याच दिवशी सायंकाळी अप्पर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सारंगल यांनी पोलीस दलाचा आदेश काढला व त्यात बदल्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानंतर सायंकाळी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढून सर्व बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती दिलेली आहे. हा आदेश पोलीस प्रशासनालाही लागू झाला आहे. पोलीस दलातील शिपाई ते सहाय्यक फौजदार या संवर्गातील बदलीपात्र अंमलदारांची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झालेली आहे. मात्र, त्याला शासन आदेशाचा ब्रेक लागला होता.
अशा होणार बदल्या
बदल्यांचे आदेश निघाल्यास त्यात विहित कालावधी पूर्ण झालेले, विहित कालावधी पूर्ण नाही परंतु, मुदतपूर्व बदलीसाठी सादर केलेली लेखी विनंती व प्रतिकूल अहवालावरून करावयाची बदली या तीन प्रकारे बदल्या होणार आहेत. बदलीपात्र असलेल्या अंमलदाराकडून माहिती मागविताना त्यांचे तीन पसंतीक्रम मागविण्यात आले असून, बदलीवर नेमणूक देतांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार तसेच पूर्वीच्या घटकास झालेला कालावधी विचारात घेऊन त्यांना उदाहरणार्थ जास्त कालावधी झालेल्या अंमलदारास पहिला पसंतीक्रम देण्यास प्राधान्य दिला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीच्या ठिकाणी नेमणूक देण्याची कार्यवाही करावी. जर तीनही पसंतीच्या ठिकाणी पदे रिक्त नसल्यास अन्य ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे.
दोन प्रभारी बदलले, आणखी बदल शक्य
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गेल्या आठवड्यात पहूरचे पोलीस निरीक्षक राहुल खेताळ यांना मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली. तर खेताळ यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांची वर्णी लावली. खेताळ यांच्या रुपाने प्रथम या पोलीस ठाण्यात निरीक्षक मिळाले होते. आता पुन्हा तेथे सहायक निरीक्षकाची नियुक्ती झाली. मुक्ताईनगरचे शिंदे यांची धुळ्यात बदली झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात प्रतिनियुक्तीने आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांची अद्याप कुठेही नियुक्ती झालेली नाही. नियमित नियुक्तीनंतर त्यांची स्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागण्याची शक्यता असून तशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे. पाटील यांनी याआधी नाशिक व औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.
कोट....
बदल्यांची माहिती तयार आहे. ३० जूनपर्यंत बदल्यांना शासनाने स्थगिती दिली आहे. त्याची मुदत संपली आहे. आता शासनाचे नवीन काय आदेश येतात त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक