राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजीला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:59+5:302021-04-21T04:16:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे.महानगर राष्ट्रवादीमध्ये एका प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे.महानगर राष्ट्रवादीमध्ये एका प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून पोस्ट गेली आहे, असे भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याला देखील सोशल मिडियातूनच थेट उत्तर देण्यात आल्याने राष्ट्रवादीत सारेकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
काही महिने आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यावर हनी ट्रॅपचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी त्यांनी तो उघडकीस आणला. त्यानंतर काही काळ सारेकाही आलबेल असल्याचे चित्र उभे करण्यात आले. मात्र तसे नसल्याचे गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये सोशल मिडियावर सुरू असलेल्या पोस्टवरून दिसून येते.
सोमवारी जळगाव शहरातील एका प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर एका ग्रुपमध्ये जामनेरच्या बीओटी प्रकरणावर चर्चा सुरू होती. त्यात जळगावच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा समावेश आणि भागिदारी असल्याचे म्हटले गेले. त्याचे काहींनी पुरावे मागितले. मात्र नंतर या वादात थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने नेते आणि नव्याने दाखल झालेल्या नेत्यांबाबत चर्चा सुरू झाली. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचे समोर आले आहे.
जयंत पाटील यांच्या कार्यक्रमातून समोर आली होती गटबाजी
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काही महिने आधी जळगाव जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी जळगावमध्ये एका विशिष्ठ ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमाला कमी वेळ द्यावा, यासाठी प्रयत्न केले गेले. अचानक दौऱ्यात नसलेले कार्यक्रम पुढे आणले गेले. त्यामुळे या ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री उशिराने पोहचले आणि तिथे फार कमी वेळ दिला गेला. त्यामुळे काही पदाधिकारी नाराज झाले होते. हे सर्व मुद्दाम घडवुन आणले गेल्याचे देखील बोलले जात होते. तिथुनच या सर्व प्रकाराला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे.
कोट - माझे खच्चीकरण करण्यासाठी या आधीची प्रयत्न झाले होते. आता ऐनकेन प्रकारे महानगराध्यक्षपद काढले जावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र कारण मिळत नसल्याने बदनाम करण्यासाठी काही जण माझ्या नावाने वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करत आहेत. - अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष