याबाबत घटनेतील १० ते १२ आरोपी विरोधात कलम ३२४अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ते सर्व आरोपी जामिनावर सुटले आहेत. या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मयताच्या नातेवाइकांनी पारोळा पोलीस ठाण्यात केली आहे. परंतु एक महिना उलटून गेला तरी कितीही कार्यवाही झाली नाही. या आरोपीपासून मयत कुटुंबाच्या जीवितास धोका आहे. मयताच्या शवविच्छेदन अहवाल तत्काळ मागवून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणे व पीडित कुटुंबास संरक्षण मिळण्याबाबत ३१ रोजी हे कुटुंब पारोळा तहसील कार्यालयापुढे उपोषणास बसणार असल्याचा इशारा मयत सर्जेराव पाटील यांचा मुलगा सागर पाटील याने पारोळा तहसील व पोलीस स्टेशनला दिला आहे.
या गंभीर विषयात पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त करत घटना घडून एक महिना उलटूनही शवविच्छेदन अहवाल प्राप्त होत नसल्याने या गुन्ह्यातील आरोपी हे गावात दहशत माजवत असून, त्यांच्यापासून आमच्या जीवितास धोका असल्याने आम्हाला पोलीस संरक्षण गरजेचे झाले आहे. पीडित कुटुंबाने महिला, पुरुषासह पारोळा पोलीस स्टेशनला तब्बल सहा तास आंदोलन केल्यानंतर आरोपींना अटक झाली होती. परंतु त्यात फक्त मारहाणीचे कलम लावले गेल्याने मयत सर्जेराव यांचे शवविच्छेदन करून तो अहवाल नाशिक येथे पाठविला होता. परंतु एक महिना उलटूनही तो प्राप्त न झाल्याने आरोपी मोकाट सुटले असून, याबाबत आम्हाला न्याय मिळावा यासाठी हे उपोषण असल्याचे सागर पाटील यांनी स्पष्ट केले.