बसमध्ये चढताना शेतकऱ्याचे एक लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:42 PM2019-12-26T12:42:04+5:302019-12-26T12:42:34+5:30
पारोळा : बसमध्ये चढताना आडगाव येथील शेतकºयाच्या हातातील पिशवीला ब्लेड मारून १ लाख १६ हजार रुपये लंपास केल्याची घटना ...
पारोळा : बसमध्ये चढताना आडगाव येथील शेतकºयाच्या हातातील पिशवीला ब्लेड मारून १ लाख १६ हजार रुपये लंपास केल्याची घटना २४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. कपाशी विकून ते हे पैसे घरी घेऊन जात असताना ही घटना घडली.
आडगाव, ता.पारोळा येथील शेतकरी श्रीराम भिवराव चौधरी हे कपाशी विकून आलेले १ लाख १६ हजार रुपये २४ रोजी आडगाव येथून नातेवाईकाला अमळनेर येथे देण्यासाठी जात होते.
दुपारी ३ वाजता पारोळा बसस्थानकावरून अमळनेर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने पैसे ठेवलेल्या कापडी पिशवीला ब्लेड मारून त्यातील सर्व १ लाख १६ हजार रुपये चोरून नेले. बसमध्ये बसल्यावर शेतकरी श्रीराम चौधरी यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार बापूराव पाटील हे करीत आहेत.
आधीच अवकाळी पावसाने कापगसाचे नुकसान झाले आहे. त्यात मेहनतीने थोडा कापूस वाचविला होता. पण अशा प्रकारे ते कष्टाचे पैसे चोरी गेल्याने शेतकºयाने आक्रोश केला.