प्रस्तावित हमाली दर वाढविण्यास शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:30+5:302021-02-11T04:17:30+5:30

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमालीमध्ये २५ टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव पणन महामंडळाला सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कृउबासला ...

Farmers oppose proposed hike rates | प्रस्तावित हमाली दर वाढविण्यास शेतकऱ्यांचा विरोध

प्रस्तावित हमाली दर वाढविण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Next

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमालीमध्ये २५ टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव पणन महामंडळाला सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कृउबासला पत्र पाठवलेले आहे. मात्र, ही दरवाढ शेतकऱ्यांच्या हिताची नसून, हा प्रस्तावित दरवाढीचा ठराव बाजार समितीने मान्य करू नये, अशी मागणी नवनिर्मिती शेतकरी मंडळाकडून करण्यात आली असून, याबाबत संस्थेतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व बाजार समितीचे सभापतींनादेखील निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी नवनिर्मिती शेतकरी मंडळाचे किशोर चौधरी, मिलिंद चौधरी, संजय चिरमाडे, संदीप नारखेडे, संजय ढाके, योगराज भोळे आदी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीच्या दरात २५ टक्के दरवाढ करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कृउबाला पत्र दिलेले आहे. ही दरवाढ प्रस्तावित करून पणन महामंडळाकडून मंजूर करून घेण्याबाबत त्या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. मात्र, कृऊबाकडून अद्याप हमालीच्या दरवाढीचा प्रस्ताव पणन महामंडळाकडे पाठवण्यात आलेला नाही. या प्रस्तावित दरवाढीला शेतकरी विरोध करीत आहेत. माथाडी संघटनेच्या बैठकीत हमालीच्या दरामध्ये २५ टक्के दरवाढ करण्याची मागणी करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळतो. शेतमालाचे दर कमी झाल्यानंतर जुन्या दराने आकारणी करूनही मोटार भाडे द्यावे लागण्याची अनेक उदाहरणे आहेत. बारदान शिलाई काम करणाऱ्यांच्या दरवाढीचाही संदर्भ घेण्यात आला आहे. त्यांच्या मजुरीमध्ये १० टक्के वाढ झालेली आहे. नवीन हमाली दर लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पट्टीतून कपात वाढणार आहे. हमाली, तोलाई ही देखील पट्टीतून कपात करण्यात येणार आहे. दरम्यान, दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास २५ टक्के वाढलेल्या हमाली दरावर आडतदेखील त्याच प्रमाणात द्यावी लागणार आहे. या दरवाढीवर लेव्हीचा भुर्दंडही कायम राहणार आहे. त्यामुळे ही दरवाढ मंजूर करण्यात येऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Farmers oppose proposed hike rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.