चोरीच्या सत्राने कजगावच्या सराफ बाजारपेठेत भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:12 AM2021-07-11T04:12:44+5:302021-07-11T04:12:44+5:30
कजगाव, ता. भडगाव : कजगावात चोरीचे सत्र गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. यात एकही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश ...
कजगाव, ता. भडगाव : कजगावात चोरीचे सत्र गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. यात एकही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यातच यावल येथे दिवसा सराफ दुकान लुटल्यामुळे कजगावच्या सराफ बाजारपेठेत भीतियुक्त वातावरण तयार झाले असून, रामभरोसे असलेल्या कजगावच्या प्रसिद्ध सराफ बाजारात तत्काळ पोलीस गस्त सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
कजगावची बाजारपेठ परिसरातील पन्नास खेड्याची बाजारपेठ असल्याने नेहमीच मोठी वर्दळ या पेठेत असते. त्यातच कजगावची मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशन रोडवर मोठाली सराफचे शोरूम अनेक कापड दुकान, किराणा दुकानसह अनेक हॉस्पिटल तीन बँक व एक व्यापारी पतसंस्था हे सारेच एकाच रोडवर असल्याने रोजच तुडुंब गर्दी या पेठेत असते. लाखो रुपयांची उलाढाल नित्याची असल्याने हे सारे रामभरोसेच आहे, अशा या महत्त्वपूर्ण बाजारपेठेला कोणतीही पोलीस गस्त नसल्याने गुन्हेगार प्रवृत्ती डोके वर काढत असल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून सुरू झालेले चोरीचे सत्र थांबण्यास तयार नाही किंवा एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
भडगाव तालुक्यातील सर्वांत मोठे गाव पूर्ण तालुक्यात सर्वांत मोठी बाजारपेठ भडगाव प्रमाणेच महत्त्वपूर्ण किंबहुना भडगावपेक्षाही मोठी उलाढाल असलेले गाव, रेल्वे स्टेशन असलेले गाव, प्रसिद्ध केळीची बाजारपेठ हे सारेच कजगावात असल्याने येथे रोजच यात्रा भरते. मात्र, येथे सुरक्षा नसल्याने सारेच असुरक्षित आहेत.
या साऱ्या बाबीचा गांभीर्याने विचार करून पंचवीस वर्षांपूर्वी कजगाव येथे पोलीस मदत केंद्र देण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात येथे कायमस्वरूपी पोलीस नियुक्त केल्याने गुन्हेगार प्रवृत्ती मोडीत काढली होती. मात्र, कालांतराने जसजसे पोलीस मदत केंद्र ओस पडू लागले. तसतसे गुन्हेगार प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक घरफोड्या झाल्या; मात्र तपास लागलाच नाही. यात सराफकडील चोऱ्या, दरोडा यांचादेखील तपास लागला नाही. गेल्या दीड महिन्यापासून अज्ञात चोरट्यांनी चांगलेच डोके वर काढले आहे. मात्र, एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. यात घरफोडी दिवसाढवळ्या रस्ता लूट, अनेक मोटारसायकल चोऱ्या, याच सराफ बाजारातून बँकेतून पैसे काढून घराकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे वीस हजार रुपये गायब असले प्रकार गेल्या दिड महिन्यापासून सुरूच आहे.
याबाबत ‘आमदार आपल्या गावी’ याप्रसंगी कजगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन यांनी आमदार किशोर पाटील यांच्याकडे कजगाव मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलीस देण्याची मागणी केली होती. याप्रसंगी आमदार पाटील यांनी याबाबत आपण पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलून कजगाव येथे कायमस्वरूपी पोलीस देण्याबाबत चर्चा करून येथे कायमस्वरूपी पोलीस देण्याचे आश्वासन प्रसंगी दिले होते. मात्र, अद्याप येथे कायमस्वरूपी पोलीस नसल्याने कजगावची बाजारपेठ असुरक्षित आहे.