जळगाव : टमाट्याने भरलेली मालवाहतूक वाहनाला रस्त्यात अडवून चार जणांनी चाकूचा धाक दाखवून चालक व क्लिनरला लुटल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री शिरसोली रस्त्यावर घडली़ याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पोलिसांनी लूटमार करणाऱ्या अश्विन यशवंत सोनवणे (२०, रा़ मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी), विजय सुनील पारधी (२०), नितीन अनिल नन्नवरे (२०, दोन्ही रा़ ताबापुरा) या संशयितांना अटक करण्यात आली तर त्यांच्यासोबत एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आलेऔरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवासी ज्ञानेश्वर बिसन शिसे यांच्या मालकीच्या मालवाहतूक चारचाकी वाहनावर (क्रमांक़ एमएच़२०़डीई ३३४९) वर विकास सुरेश गायके (वय-२१, रा़ कनकौतीनगर, कन्नड, जि़ औरंगाबाद) हा चालक म्हणून कामाला आहे़ गुरुवार, ९ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावातील शेतकऱ्यांचे टमाटे घेऊन जळगाव येथे विक्री करण्यासाठी विकास हा कन्नड येथून निघाला होता़ सोबत क्लिनर अजय (पूर्ण नाव माहिती नाही) होता. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कृष्णा लॉन्स मंगल कार्यालयाजवळील शिरसोली रस्त्यावर अज्ञात चार तरुणांनी रस्त्यात दुचाकी आडवी लावून विकास यांची चारचाकी थांबविली़ त्यातील एकाने ट्रकचालक विकास आणि क्लिनर अजय यांना मारहाण करून दोघांकडून ६०० रुपए रोख काढून घेतले. तर एकाने चाकू दाखवून कोणाला सांगितले तर पाहून घेऊ असा दमही भरला़ या प्रकारानंतर विकास हा तक्रार करण्यासाठी पोलिसात जात असताना त्यास डीमार्ट जवळ रात्रीला गस्तीला असलेले पोलीस दिसले़ त्याने त्वरित पोलीस कर्मचारी नीलेश पाटील, असिम तडवी, संतोष सोनवणे तसेच होमगार्ड पंकज सापकर, प्रशांत शिंदे यांना घटनेची माहिती दिली़ तर ते चौघे त्या भागातच असल्याचे सांगितले़ पोलिसांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेतली़ परंतु, पोलिसांना पाहून त्या चोरट्यांनी जागेवरचं दुचाकी सोडून पळ काढला़ पोलिसांनी रात्री (क्रमांक़ एमएच १९ डीके ६४३२) ही दुचाकी जप्त केली़कोरोनावर मात करीत शुक्रवारी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाले़ अन् हजर होताच त्यांनी लुटमारचा गुन्ह्याचा उलगडा केला़ लुटमार करणारे चौघे हे तांबापुरा भागातील असल्याची माहिती त्यांना मिळाली़ त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले. चौघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे़
चाकुचा धाक दाखवून चालकासह क्लिनरला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:16 PM