चाळीसगावच्या ‘सर्वोदय’ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 10:08 PM2021-02-04T22:08:29+5:302021-02-04T22:10:51+5:30
गुरुवारी जळगाव येथे जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात अंतिम मतदार प्रसिद्ध झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : शिक्षणाची शतकोत्तर परंपरा असणाऱ्या उंबरखेडे येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या रणधुमाळीचे सायरन वाजले असून गुरुवारी जळगाव येथे जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात अंतिम मतदार प्रसिद्ध झाली आहे. यामुळे निवडणूक कार्यक्रम कधी घोषित होतो? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. ४६८१ सभासदांना मतदान करता येणार असून संचालकांची एकूण १९ पदे आहेत.
चाळीसगाव तालुक्याचे सहकार व शिक्षण महर्षी रामराव जिभाऊ पाटील यांनी ब्रिटिश अंमल असतानाच सर्वोदय शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे संस्थेचा भडगाव व चाळीसगाव तालुक्यात शाखा विस्तार झाला. एकूण आठ शाखा असून संस्थेमार्फत वसतिगृहे, आयटीआय, आश्रमशाळा, माध्यमिक विद्यालये, ज्युनिअर कॉलेज चालविले जातात.
विद्यमान संचालक मडळाची मुदत गेल्यावर्षी ८ जानेवारी २०२० रोजीच संपली आहे. मात्र कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. मध्यंतरी निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला. त्यानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. पुन्हा शासनाच्या आदेशाने स्थगिती मिळाली. नुकताच शासनाने पुन्हा आदेश देऊन सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने सर्वोदयसाठी हालचाली गतिमान झाल्या आहे. प्रारूप मतदार यादीतील १७००हून अधिक नावे अक्रियाशील सभासद म्हणून वगळण्यात आल्याने हरकत घेण्यात आली. अखेरीस हरकत ग्राह्य धरून गुरुवारी ४६८१ मतदार सभासदांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उदेसिंह पवार यांचे दीर्घकाळ वर्चस्व
स्थापनेपासूनच उपाध्यक्ष असलेल्या ज्येष्ठ नेते उदेसिंह पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. १९८७पासून ते २०२० पर्यत त्यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. त्यांच्या निधनानंतर विकास पाटील यांची निवड झाली आहे.
१९ जागांसाठी सामना
१९ जागांसाठी सामना रंगणार असून उदेसिंह यांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक होऊ घातली आहे.