शिक्षण संस्थाचालकाला मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:57+5:302021-01-24T04:07:57+5:30
जळगाव : शैक्षणिक संस्थेविषयीच्या वादप्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी धाव घेतल्याच्या कारणावरून सिग्नेट फाउंडेशन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष ...
जळगाव : शैक्षणिक संस्थेविषयीच्या वादप्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी धाव घेतल्याच्या कारणावरून सिग्नेट फाउंडेशन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मनीष रमेश कथुरिया (रा. मेहरुण तलाव) यांना घरात घुसून मारहाण केली व कॅमेऱ्याचा डीव्हीआर, इतर साहित्य लुटून नेल्याप्रकरणी दिशा अकादमीचे संचालक विकास मनिलाल बहादुरसिंग परिहार, संजय मनिलाल बहादुरसिंग परिहार (रा. गणेश कॉलनीजवळ) यांच्यासह इतर सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मनीष रमेश कथुरिया यांनी विकास परिहार यांच्याकडे सिग्नेट स्कूलचे व्यवस्थापन सोपविलेले असताना त्यांनी कार्यकारणी व पदाधिकारी निवडीचा बदल करून तसा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला होता. याबाबत कथुरिया यांनी त्यांच्याकडे दाद मागितली असता त्याचा राग येऊन परिहार भावंडासह इतर सहा जणांनी ४ जानेवारी रोजी कारमधून येऊन कथुरिया यांना घरात घुसून मारहाण केली व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, इतर साहित्य लुटून नेण्यासह कोऱ्या धनादेशावर जबरदस्तीने सही करायला लावल्याची घटना घडल्याबाबत मनीष रमेश कथुरिया (रा. मेहरुण तलाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी या प्रकरणाची चौकशी सहायक फौजदार अतुल वंजारी यांच्याकडे सोपवली होती. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री हा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, परिहार यांच्याविरुद्ध यापूर्वी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, विशाल चढ्ढा यांनीही न्यायालयात तक्रार दाखल केलेली आहे. आता हे त्यांचे तिसरे प्रकरण आहे.