दूध संघाच्या भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:16+5:302021-06-10T04:13:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातर्फे अधिकारी अणि तांत्रिक पदासाठीची भरती प्रक्रिया राबविली जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातर्फे अधिकारी अणि तांत्रिक पदासाठीची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या ६३ जणांना नियमित केले जाणार असून त्यात मोठा आर्थिक व्यवहार केला जात असल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचारी एन.जे. पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे बुधवारी केली आहे. या भरती प्रक्रियेत आरक्षण देखील पाळले जात जात नाही. त्यामुळे ही भरती थांबवण्याची मागणीही त्यांनी या निवेदनात केली आहे.
एन.जे. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले की, दूध संघात मनोज लिमये हे बेकायदेशीरपणे कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत. तसेच निवृत्तीनंतरदेखील डॉ. चंद्रकांत पाटील आणि लिपिक बाळू टोके हे काम करत आहेत. आता दूध संघाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आरक्षण कायद्यानुसार अनुसूचीत जाती-जमाती व अन्य जातींच्या उमेदवारांची भरती केलेली नाही. त्यामुळे या भरतीत आरक्षण कायद्याचा भंग झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत १० एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षकांकडे तक्रार दिली आहे. मात्र अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दि. १९ एप्रिल रोजी औरंगाबाद खंडपीठातही अर्ज करण्यात आला असून भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या सहनिबंधकांकडून २६३ पदांची सरळ भरती करण्याचे मंजुरीचे पत्र देण्यात आले आहे. त्यापैकी १६३ पदांच्या भरतीची जाहिरात दूध संघातर्फे जाहीर करण्यात आली आहे. मात्र या जागांवर कुणाला नेमायचे हे आधीच निश्चित झाले आहे. २०१५ पासून ज्या तरुणांना कंत्राटी पध्दतीवर भरती करण्यात आले आहे त्यांनाच या पदासाठी नेमणुकीचे आदेश दिले जाणार असल्याचे एन.जे. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.