जळगाव : शिरसोली येथील आकाशवाणी प्रक्षेपण केंद्राच्या इमारतीला बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आग लागून मुख्य स्टुडिओ, संगणक रुम व रोहित्रासह वायरिंग जळाली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने कर्तव्यावर असलेले दोन कर्मचारी सुखरूप आहेत. आगीची माहिती मिळताच आकाशवाणी केंद्राचे वरिष्ठ अधिकारी सुधीर ओखदे तातडीने घटनास्थळी हजर झाले.
दरम्यान, जैन इरिगेशन, महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबासह शिरसोली येथील ग्रामस्थांनी प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली.
बुधवारी दुपारी ही आग लागल्यानंतर बंदिस्त इमारतीमुळे ही आग कुठे लागली, यांचा अंदाजच येत नव्हता. आग आतल्याआत अधिकच भडकत गेली. यामुळे संपूर्ण इमारतीला धुरांच्या लोळांनी वेढल्याने आग कुठून विझवावी, असा प्रश्र्न पडला होता. अखेर चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क लावून आत पाण्याचे फवारे मारण्यात आले. या वेळी शिरसोली येथील प्रमोद शार्दुल, चंद्रकांत शार्दुल यांनी गॅसकटरने इमारतीचा दुसरा लोखंडी दरवाजा कापल्याने काही प्रमाणात आगीचा अंदाज आला व आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
अग्निशमन विभागाचे कर्मचारी कैलास सैंदाणे, महेंद्र पाटील, दीपक कापसे, मनोज पाटील, ग्रामस्थ गुलाब पाटील, दीपक जाधव, संजय पाटील, शैलेश सोनवणे, श्रीकांत बारी, कुंदन सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य केले. ही आग शाॅर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दैव बलवत्तर
आग लागली त्यावेळी ड्युटीवर धनंजय निकुंभ व जितेंद्र नेमाडे हे दुसऱ्या रुममध्ये कामात व्यस्त होते. त्यांना अचानक धुराचे लोट दिसले. काही क्षणात इमारतीला चारही बाजूने धुराने घेरल्याने त्यांना श्वसनाचा त्रास व्हायला लागला. त्यांनी कशीबशी सुटका करून अग्निशमन विभाग व वरिष्ठांना घटना कळविली.