ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे जप्त वाहनांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:34 PM2021-05-12T22:34:11+5:302021-05-12T22:34:45+5:30
अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या वाहनांना आग लागण्याची घटना घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : येथील ग्रामीण पोलीस स्टेशनशेजारील पोलीस मैदानावर अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेली वाहने महसूल प्रशासनामार्फत ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याकडे ताब्यात दिलेली असतात. या वाहनांना आग लागण्याची घटना घडली आहे.
ही वाहने न्यायालयीन प्रक्रियेतून वाहनमालकांच्या ताब्यात येईपर्यंत ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा यांच्या ताब्यात गेलेली असतात. परंतु, जप्त केलेल्या वाहनांची महसूल प्रशासन व ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथील अधिकारी व कर्मचारी कोणतीही काळजी घेत नाहीत, असा आरोप वाहनमालकांनी घेतला आहे.
या वाहनांना दि. ११ रोजी आग लागण्याची घटना घडलेली आहे. आगीमध्ये ट्रॅक्टर - ट्रॉली तसेच इतर वाहनांचे सुटे भाग व महागडे टायर आणि ट्यूब जळून नुकसान झाल्याची घटना घडलेली आहे. या आगीमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तहसीलदार व ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकारी हे जप्त वाहनांच्या बाबतीत बेफिकिरीने वागताना दिसतात. वाहनधारक हे न्यायालयीन लढा लढत असताना प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या वाहनांची काळजी घेणे, जप्त केलेले वाहन त्याच स्थितीत वाहनमालकाला परत करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते. मात्र, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन वाहनांच्या बाबतीत अत्यंत बेफिकीरपणे वागत असल्याचे दिसून येते, असा आरोप वाहनमालक देवकांत चौधरी यांनी केला आहे.