लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. अशातच दोन ते अडीच महिन्यांपूर्वी आधी वडिलांचा... नंतर आईचा आणि आता घराच्या स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या कन्येचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली. आरती साहेबराव बाविस्कर (३३, रा. खोटेनगर) असे मयत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, अद्याप मृत्यूचे कारण समजून आलेले नसून व्हीसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. तरुणीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
आरती बाविस्कर या खोटेनगर येथे मोठा भाऊ कुलभूषण, वहिनी प्रतीक्षा व लहान भाऊ शाहू आणि दोन भाच्यांसह वास्तव्यास होत्या. दरम्यान, दोन ते अडीच महिन्यांपूर्वी त्यांच्यासह आई-वडिलांना कोरोनाची बाधा झाली होती. त्या वेळी कोरोनामुळे वडील साहेबराव पाटील यांचा मृत्यू झाला होता तर आरती व त्यांच्या आई वैशाली यांनी कोरोनावर मात करून घरी परतल्या होत्या. मात्र, पाच दिवसांनंतर अचानक प्रकृती बिघडून आईचा मृत्यू झाला. बाविस्कर कुटुंब हा आघात सहन करीत नाही तोच शनिवारी सकाळी आरती घरातील स्वच्छतागृहात बेशुद्ध आढळून आली. पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतरही आरती स्वच्छतागृहातून बाहेर न आल्याने मोठ्या भावाने दार ठोठावले. आतून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. त्या वेळी आरती ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
लागलीच रुग्णालयात हलविले
कुटुंबीयांनी तिला तत्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास रुग्णालयात उपचार सुरू असताना, आरतीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. दरम्यान, मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे व्हीसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.
साई, प्रसाद मला माफ कर
आरती यांच्या हातावर ‘साई, प्रसाद मला माफ कर’ असे लिहिलेले, पोलिसांना व कुटुंबीयांना आढळून आले. तसेच साई, प्रसाद ही त्यांच्या मोठ्या भावाची मुले आहेत. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, आरती हिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरती करीत होती स्पर्धा परीक्षेची तयारी
मृत आरती ही अविवाहित होती. काही महिन्यांपासून ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. तर बारा ते तेरा दिवसांपूर्वी आरती हिच्या मामेभावाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.