प्रथमचं होणार विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:02+5:302021-04-09T04:17:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ हा सोमवार, ३ मे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ हा सोमवार, ३ मे रोजी ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच हा सोहळा ऑनलाइन पध्दतीने पार पडणार असून याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून केले जाणार आहे.
पदवी व पदविका प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन प्रणालीद्वारे आवेदनपत्र मागविण्यात आले होते. मार्च किंवा एप्रिल महिन्यात दीक्षांत समारंभ होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, कोरोनाने पुन्हा हातापाय पसरवल्यामुळे प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले. गर्दी करण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा दीक्षांत ऑनलाइन होईल की ऑफलाइन याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर गुरुवारी व्यवस्थापन व विद्या परिषदेच्या बैठकीत दीक्षांत समारंभ ऑनलाइन घेण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आता ३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ऑनलाइन पध्दतीने हा समांरभ होणार आहे.
पोस्टाने पाठविणार प्रमाणपत्र
लवकरच ज्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, त्यांच्या नावांची यादी ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी केली जाणार आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्नातकांना त्यांचे पदवी, पदविका प्रमाणापत्र हे दीक्षांत समारंभानंतर नोंदणीकृत पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभाची संपूर्ण माहिती ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.