लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सायटोमेगालो व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. अमळनेरच्या नितीन नंदलाल परदेशी (३३) या तरुणाला कोरोनानंतर सायटोमेगालो या व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर त्याचा २४ रोजी रात्री मृत्यू झाला. पोस्ट कोरोनात सायटोमेगालो व्हायरसची लागण होऊन दगावलेला बहुधा पहिलाच रुग्ण असावा.
अमळनेरच्या नितीन परदेशी याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याने कोरोनाचे उपचार अमळनेरमध्येच घेतले. त्यानंतर तो घरी गेला. त्याला पुन्हा ताप आला. त्यानंतर ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यानंतर त्याला जळगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तरीही प्रकृती खालावत असलल्याने तसेच व्हेंटिलेटरची गरज भासत असल्याने डॉ. नीलेश किनगे यांच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर २५ दिवस उपचार करण्यात आले. अखेर सोमवारी रात्री उशिराने त्याची प्राणज्योत मालावली. पोस्ट कोरोनाच्या अडचणींमध्ये सायटोमेगालो व्हायरसने दगावलेला हा बहुधा पहिलाच रुग्ण असावा.
गेल्या काही दिवसांपासून नितीन परदेशी याची ऑक्सिजन पातळी घसरत होती. त्यातच त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. त्यानंतर त्याला सायटोमेगालो व्हायरसशी संबधित औषधे देण्यात येऊ लागली. मात्र प्रकृती बिघडतच गेल्याने त्याचा मृत्यू झाला. सायटोमेगालो हा नवीन विषाणु नाही. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांची रोग प्रतिकारशक्ती खूपच कमी होते.
काय आहे सायटोमेगालो विषाणू?
सायटोमेगालो हा विषाणू अनेकदा सदृढ व्यक्तींच्या शरिरात निष्क्रीय अवस्थेत असू शकतो. मात्र रुग्णाची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की, तोदेखील ॲक्टिव्ह होतो. यात रुग्णाला अंगावर पुरळ येणे, ताप येणे, ऑक्सिजन पातळी कमी होणे, यासारखी लक्षणे दिसून येतात. तसेच शरिराच्या कोणत्याही भागात इन्फेक्शन होऊ शकते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी सांगितले.
शासकीय पातळीवर अनास्था
जिल्ह्यात अद्याप कोणत्याही शासकीय रुग्णालयांमध्ये सायटोमेगालोची चाचणी केली जात नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. त्यामुळे पोस्ट कोविड रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायटोमेगालो विषाणूची लागण होण्याचे प्रमाण आहे की नाही, हे चाचण्याच नसल्याने कळू शकले नाही.