भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 04:18 PM2018-10-31T16:18:01+5:302018-10-31T16:19:10+5:30
असमाधानकारक पावसामुळे भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे राहिल्याने रब्बी हंगामाही संकटात सापडला आहे.
वरणगाव, ता.भुसावळ : असमाधानकारक पावसामुळे भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे राहिल्याने रब्बी हंगामाही संकटात सापडला आहे.
मोसमात अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पिकांचे नुकसान तर झालेच, परंतु रब्बीच्या हंगामाकरिता सिंचयानाकरिता पाणी उपलब्ध नसल्याने एक हजार ४४० हेक्टरवरील रब्बीची पेरणी धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
भुसावळ विभागातील लघुसिंचन विभागाच्या अखत्यारीतील भुसावळ तालुक्यातील खंडाळा, मोंढाळा, वेल्हाळा तर बोदवड तालुक्यातील साळशिंगी व जुनोना तलावात यावर्षी पावसाळ्याचे प्रमाण अल्प राहिले. परिणामी तलावात पावसाअभावी पाणीसाठा झाला नाही. या तलावांच्या लाभ क्षेत्रातील तब्बल दीड हजार हेक्टरवर सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकºयांना रब्बीचा हंगाम घेणे अशक्य झाले आहे.
भुसावळ विभागातील एकमेव वेल्हाळे तलावाल अल्पसा पाणीसाठा आहे. तो सिंचनाकरिता तोकडा पडणार असल्याने त्या लाभ क्षेत्रातील शेतकºयांना कृषी सिंचनाकरिता पाणी मिळणे अशक्य आहे. यामुळे शेतजमीन पेरणीअभावी पडून आहे. वेल्हाळे तलावाची उभारणीपासून मागील वर्षापर्यंत तलाव ऐन उन्हाळ्यातही ओसंडत होता. पाऊस अल्पसा झाला तरी दीपनगर औष्णिक केंद्राकडून वेल्हाळे येथील राखेच्या बंडात राखमिश्रीत पाणी सोडण्यात येत होते. तेच पाणी हळूहळू वाहत त्या पाण्याचा साठा तलावात होत होता. त्यामुळे हा तलाव नेहमी तुडूंब भरलेला रहायचा. परंतु प्रदूषण होत असल्याच्या कारणावरून अखेर औष्णिक वीज केंद्राकडून राखमिश्रीत पाण्याचे रिसायकलिंग करण्यात आल्याने तलावात पाणी येणे थांबले आहे. तलावात आज रोजी अल्पसा साठा उपलब्ध आहे. शेतकºयांना औष्णिक प्रकल्पामुळे वरदान ठरलेला तलाव प्रदूषणाच्या तक्रारीमुळे शेतकºयांच्या मूळावर आल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.
याच तलावातून अवैधरित्या वीजपंप लावून चोरी केली जात आहे. पाण्याची चोरी रोखण्याकरिता समितीही बनविण्यात आली. परंतु कारवाई होत नसल्याने बिनधास्तपणे पाण्याची चोरी सुरूच आहे.
अशी आहे भुसावळ विभागाच्या लघुसिंचन तलावांची स्थिती
वेल्हाळे तलावाचे लाभक्षेत्र ३६४ हेक्टर आज रोजी २१ टक्के, मोंढाळा तलावाचे लाभ क्षेत्र २६४ हेक्टर, पाणी साठा शून्य टक्के, खंडाळा लाभ क्षेत्र २३२ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, साळशिंगी लाभ क्षेत्र २६१ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, जुनाना लाभ क्षेत्र ३१९ हेक्टर पाणीसाठा शून्य अशी तलावाची पावसाअभावी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.