पाचोरा जि.जळगाव : महिलेच्या मृतदेहावर जि. प. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव करण्यात आला. ही घटना निपाणे ता. पाचोरा येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह ११ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर पाटील रोशन पाटील, राजेंद्र पाटील, त्र्यंबक पाटील, मयूर पाटील, गोकुळ पाटील, निलेश पाटील, शांताराम पाटील, भैय्या पाटील, अजबराव पाटील आणि वैभव पाटील यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निपाणे येथील समाधान वामन धनुर्धर यांच्या आई निलाबाई धनुर्धर यांचे ११ रोजी सूरत येथे निधन झाले. त्यांचा मृतदेह १२ रोजी निपाणे येथे आणण्यात आला व रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जि.प.च्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत मृतदेह आणण्यात आला. त्यावेळी वरील लोकांनी वाद घातला आणि जातिवाचक शिवीगाळ केली तसेच स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले.
या प्रकरणी समाधान धनुर्धर यांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलिसात वरील ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.