जळगाव - विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. सध्या ते चोपडा येथेच होम क्वारंटाईन आहेत. घशात दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने गुजराथी यांनी शनिवारी कोरोनाची रॅपीड चाचणी केली. त्यात अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर छातीच्या सिटीस्कॅनमध्येही कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. लोकेन्द्र महाजन हे अरुणभाई यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच सध्या ऑक्सीजन स्तरही ९७ टक्के आहे. इतर कोणताही त्रास जाणवत नसल्याने त्यांना चोपडा येथील त्यांच्या राहत्या घरीच क्वारंटाईनचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अरुणभाई यांच्यासह संपूर्ण परिवारातील सदस्यांची कोरोना चाचणी झाली होती. मात्र त्यावेळी एकही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आला नव्हता, अशी माहिती अरुणभाईंचे चिरंजीव आशिष गुजराथी यांनी दिली.
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांना कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 7:18 PM