रावेर : गतवर्षी पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात जळगाव जिल्ह्याला चार पुरस्कार मिळाले आहेत. यात चिनावल व पहूरपेठ या ग्रामपंचायती, तर जामनेर व मुक्ताईनगर या दोन नगरपालिकांचा समावेश आहे.
चिनावल, ता. रावेर ग्रामपंचायत राज्यात तिसर्या व पहूरपेठ ग्रामपंचायत चौथ्या स्थानी आल्याने त्यांना प्रत्येकी ५० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नगरपालिकांमध्ये जामनेर नगरपालिकेला तृतीय क्रमांकाचे २ कोटी रुपयांचे व मुक्ताईनगर नगरपंचायतीला चौथ्या क्रमांकावर ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
सर्वोत्तम म्हणून नाशिक विभागीय आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी, तर जळगाव जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही दीड लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहेत. संबंधित मूल्यमापन समितीद्वारे डेस्कटॉप व आभासी मूल्यमापन करून निवड झालेल्या चिनावल व पहूरपेठ या गावांच्या लोकप्रतिनिधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले होते. या दोन्ही गावांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले आहे.
चिनावलच्या सरपंच भावना बोरोले व ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. सपकाळे यांनी मूल्यमापनात चांगले सादरीकरण केले. त्यामुळे त्यांना पुरस्कार मिळाला, अशी माहिती गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी दिली. नगरपालिकांमध्ये जामनेर व मुक्ताईनगर नगरपालिकेलाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ५० टक्के रकमेचे पाहिल्या टप्प्यातील पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत. पारितोषिक रकमेचा विनियोग माझी वसुंधरा अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या पर्यावरण संतुलनासाठी निर्देशित केलेल्या विकासकामांसाठी करण्यात येणार आहे.